

नगर, पुढारी वृत्तसेवा : नालेगाव परिसरामध्ये ख्रिश्चन व गोसावी समाजाच्या दफनभूमीस मनपातर्फे जागा देण्यात आली आहे. त्यास पोलिस बंदोबस्तास जागा साफसफाई करीत असताना नालेगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आणि या जागेवर दफनभूमी करून नये. त्यासाठी आम्ही 2010 मध्ये विरोध केला होता असे सांगत दफनभूमीस जागा दिल्यास आम्ही कुटुंबासह मनपात उपोषण करू, असा इशारा नालेगाव ग्रामस्थांनी दिला.
निवेदनात म्हटले, की अहमदनगर महानगरपालिकेने खिश्चन व गोसावी समाज यांना सन 2010 मध्ये ठराव करून जागा देण्याबाबत सूचविले होते. त्यावेळी आम्ही सर्व नागरिकांनी त्याला विरोध केला होता. तशी कागदपत्रे आमच्याकडे आहेत. त्यावेळी अशी जागा देण्यात येणार नाही, असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. आज त्या ठिकाणी दफनभूमीचे काम सुरू झाल्याचे माहिती समजली. सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले. ख्रिश्चन व गोसावी समाजाने ही जागा आरक्षित असल्याचे सांगितले. कामात अडथळा आणला, तर गुन्हा दाखल करू, असे त्यांनी सांगितले आहे.
याभागामध्ये पूर्वीपासून रावळ, भराडी, गोसावी यांची दफनभूमी आहे. सरकारी बेवारस मृतदेहही याच परिसरात दफन केले जात आहेत. दफन केलेले मृतदेह कुत्रे उकरून बाहेर आणतात. या भागात एक नवीन उपनगर तयार होत आहे. याचा प्रशासनाने विचार करावा. संबंधित समाज बांधवांना ते राहत असलेल्या ठिकाणी दफनभूमीसाठी जागा द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक, श्याम नळकांडे, नगरसेवक अजय चितळे, नगरसेवक सचिन शिंदे, वैभव वाघ, विकी वाघ, राम वाघ, शरद ठाणगे, संतोष लांडे, संदीप दातरंगे, बबन रोहकले, विजय वाडेकर, मधुकर टोणे, सतीश रोहकले, अंबादास जगताप, अशोक मुजळे, संभाजी वाघ, सुभाष रोहोकले, संतोष उगले, रामकिसन राजळे, नंदू रोहकले आदी उपस्थित होते.