कोळगाव, महेेशकुमार शिंदे : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे येथील 14 हजार 824 पशुधनाचे लसीकरण, उपचार वेळेवर होत नाही. तात्पुरते पशुवैद्यकीय अधिकारी हे कधी येतात, हे माहीत नसल्याने शेतकर्यांत संताप व्यक्त होत आहे.
दोन पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात एक जागा श्रेणी एकची पशुधन विकास अधिकार्यांची, तर दुसरी जागा पशुधन पर्यवेक्षक डॉक्टरांसाठी आहे. सध्या एक ड्रेसर व एक शिपाई आहे. कोळगावात 6267, भापकरवाडी 758, लगडवाडी 820, वेठेकरवाडी 664, घारगाव 3423, कोथूळ 1569, व घोटवी 1323 अशी एकूण 14824 पशुधन आहे. सध्या पिंपळगाव पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी प्रशांत गुंजाळ यांना कोळगाव चा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. परंतु सध्या डॉक्टर गुंजाळ हे कोळगावसाठी दोन दिवस देतात. पिंपळगाव दवाखान्यांतर्गत निंबवी, सारोळा, विसापूर, चांभुर्डी, कोरेगाव, मुंगूसगाव, खरातवाडी, उख्खलगाव या गावांची जबाबदारी त्यांच्यावरच आहे
पशुवैद्यकीय अधिकारी टोरपेे सेवानिवृत्त झाल्याने सध्या कोळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पूर्णवेळ अधिकारी नाही. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पूर्ण वेळ अधिकारी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला.
श्रीगोंदा, कोळगाव, पेडगाव, मढेवडगाव, म्हसे येथील पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. यापैकी कोळगाव व श्रीगोंदा येथील श्रेणी एकच्या जागा आहे. त्यांची नियुक्ती शासनामार्फत केली जाते. पेडगाव, मढेवडगाव, म्हसे येथे श्रेणी दोनच्या जागा असून, त्यांची नियुक्ती जि. प. मार्फत केली जाते. कोळगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर टोरपे सेवानिवृत्त झाल्याने, नवीन नियुक्तीसाठी अहवाल दिल्याचे विस्तार अधिकारी डॉ. गाडे यांनी सांगितले.
डॉक्टर गुंजाळ म्हणाले की, मी बुधवार व शनिवार या दोन दिवशी कोळगावमध्ये उपस्थित असतो व इतर वेळी मागणी असेल तेव्हाही उपलब्ध होतो.सध्या कोळगाव हा पालक दवाखाना असून, त्याच्या अंतर्गत श्रेणी दोनचे घोगरगाव, मांडवगण, चिखलीत दवाखाने आहेत. आम्ही सध्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबवित आहोत, तसेच कृत्रिम रेतन, वंध्यत्व निवारण घटसर्प, फर्या रोगांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत.