

बोटा, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी महत्त्वाचे मानले जाणारे कोटमारा धरण मंगळवारी (दि.19) पूर्ण क्षमतेने भरले. पठार भागातील नेते मंडळींसह, शेतकरी व ग्रामस्थांनी जलपूजन करीत गंगा मातेला साडी, चोळी अर्पण करून महाआरतीने आनंदोत्सव साजरा केला.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोटमारा धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे ओढे, नाले, नदी तुडूंब भरून वाहू लागल्याने अखेर मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरले.
पठार भागातील सरपंच, उपसरपंचांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यसह अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी कोटमारा धरणावर हजेरी लावत जलपूजन केले. कोटमारा धरणावर गंगा मातेला साडी, चोळी अर्पण करीत महाआरती केली.
कोटमारा धरण पठार भागातील कुरकुटवाडी, बोटा, आंबी दुमाला, जाचकवाडी परिसरातील वाडी, वस्त्यांसाठी वरदान ठरले आहे.हे धरण भरल्याने या परिसरातील शेतकर्यांचा वर्षभर शेतीसाठी पाणी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, उपसरपंच पांडुरंग शेळके, सरपंच सोनालीताई शेळके, सरपंच नूतनताई कुरकुटे, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, संदीप ढेरंगे, पोलिस पाटील शिवाजी शेळके, विकास शेळके, भाग्यश्रीताई नरवडे, भास्कर कुरकुटे, सीताराम नरवडे, सुखदेव शेळके सयाजी ढेरंगे, उपसरपंच भिवाजी ढेरगे, रामदास नरवडे, देवराम देसले, रमेश ढेरंगे, दीपक कुरकुटे, बबन कुरकुटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पठार भागासाठी कोटमारा धरण वरदान आहे. कोटमारा पूर्ण क्षमतेने भरल्याने पठार भागातील अनेक गावांसह वाड्या, वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न तब्बल वर्षभर मिटल्याने शेतकर्यांमध्ये समाधानचे वातावरण आहे.
– अजय फटांगरे, माजी जि. प. सदस्य
कोटमारा धरण भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आता पुढील वर्षभर चिंतामुक्त झाला आहे. आंबी दुमाला, कुरकुटवाडी, बोटा परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेतकर्यांसह आजी, माजी सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी गंगा मातेला साडी, चोळी अर्पण करुन, महाआरतीने आनंदोत्सव साजरा केला.
– संतोष शेळके, माजी पं. स. सदस्य