

नगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा महिन्यांपासून अत्यल्प मनुष्यबळातही जलजीवन मिशनला गती देणार्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता आनंद रुपनर यांच्याकडील 'कार्यकारी अभियंता'पदाचा अतिरिक्त पदभार सीईओंनी तडकाफडकी काढल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पदावर आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. एस. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय कारणास्तव कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, या पदाचा कार्यभार बदलणे आवश्यक असल्यामुळे ही बदली केली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे. वास्तविक उपअभियंता आनंद रुपनर यांनी गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तत्कालीन सीईओ राजेंद्र क्षीरसागर व सध्याचे सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात पाणी योजनांना गती दिली होती. अत्यल्प मनुष्यबळ असताना, तसेच अनुभवी कर्मचारी सोबत नसतानाही रुपनर यांनी जलजीवनच्या कामांना वेग दिला होता.
सन 2024 पर्यंत 1000 गावांमध्ये 950 पाणी योजना पूर्णत्वास येण्यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅन तयार केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी, सीईओ यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. तसेच त्यांच्या मदतीला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. असे असताना दि. 23 रोजी सीईओ येरेकर यांनी त्यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेतला. आता या आदेशान्वये कार्यभार देण्यात आलेल्या उपअभियंता जोशी यांनी त्यांच्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे आदेशात म्हटले आहे.