

सावेडी, पुढारी वृत्तसेवा : दशक्रिया विधीच्या दिवशी मयताच्या नैवेद्याला काकस्पर्श झाला तरच मोक्ष मिळतो, अशी आप्तेष्टांची धारणा असते. मात्र, अमरधाम परिसरातील मांस विक्रीची दुकाने उघडताच कावळे गायब होतात. त्यामुळे दशक्रिया विधी असणार्या नैवेद्याला काकस्पर्श होण्याची वाट पाहत बसावी लागते. तासन्तास वाट पाहूनही कावळे नैवेद्य ग्रहण करण्यास येत नाहीत. पर्यायाने गायीला घास देऊन विधी उरकावा लागत असल्याचे चित्र नगर येथील अमरधाममध्ये पाहावयास मिळत आहे.
नगर शहरासह सावेडी उपनगरातील मयत व्यक्तींचे अंत्यविधी व दशक्रिया विधी नालेगाव येथील अमरधामात करण्यात येतात. त्यामुळे एकाच दिवशी अमरधाम येथे अनेक दशक्रिया विधी होतात. दशक्रिया विधीसाठी येणार्या आप्तेष्टांची संख्या मोठी असते. दशक्रिया विधीसाठी आप्तेष्ट पहाटे पाच-साडेपाच वाजताच जागा पकडण्यासाठी येतात. मोक्याच्या ठिकाणी जागा भेटली, तरच आठ-साडेआठ वाजेपर्यंतच काकस्पर्श होतो. मात्र, अमरधाम परिसरालगतच्या नेप्ती नाका, शिवाजीनगर भागातील मांस विक्रीची दुकाने सकाळी नऊनंतर उघडताच कावळे या दुकानाकडे धाव घेतात. त्यामुळे अमरधाममध्ये पिंडीला काकस्पर्श होत नसल्याची चर्चा होत आहे.
दशक्रिया विधीसाठी आलेल्या आप्तेष्टांबरोबर नागरिकांना तासन्तास वाट पाहून शेवटी गायीला घास देऊन मार्ग काढावा लागत आहे. ग्रामीण भागातही कावळ्यांची संख्या कमी झाल्याने हाच मार्ग पत्करावा लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अमरधाममध्ये महापालिकेचे कर्मचारी फक्त एक नंबर गेट ते अंत्यविधीच्या शेडपर्यंत स्वच्छता करतात. इतरत्र परिसरात स्वच्छता करत नाहीत. त्यामुळे दशक्रिया विधीच्या ठिकाणी कोंबड्याचे पिसे, गवत व अस्वच्छता दिसून येते. त्यातून नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे. अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी येणार्या नागरिकांना येथे बसण्याची व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांवर विधीसाठी उभे राहण्याची वेळ येते.
अमरधामात अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी येणारे नागरिक अमरधामात व रस्त्यावरच बेशिस्तपणे आपली वाहने उभी करतात. तसेच, गाडगीळ पटांगणात बसत असणारे भाजी विक्रेते रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसतात. अमरधाम तसेच याच रस्त्यावरून जाणार्या लोकांना या भाजीविक्रेत्यांचा मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते.