

वांबोरी, पुढारी वृत्तसेवा : चित्तथरारक कसरतींच्या कलेच्या माध्यमातून सिनेसृष्टीला सुद्धा दखल घ्यायला लावणार्या वांबोरी येथील डोंबारी समाजातील कांताबाई रमेश जाधव यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर कसरतीचे खेळ करून आपली पारंपरिक कला पिढीजात जोपासली. यामधून मिळणार्या बक्षीसरूपी बिदागीवरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण अवलंबून होती. अल्पशा आजाराने त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले. हीच बाब ओळखून वांबोरीतील ज्येष्ठ नागरिक संघाने या कुटुंबाला मदतीचा हात देऊन या कुटुंबाची चूल पेटविण्यास आधार दिला.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील डोंबारी समाजातील स्व. कांताबाई यांनी आपल्या चित्तथरारक कलेच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीला सुद्धा भुरळ घालून आपल्यातील कलेची दखल घेण्याचे कर्तृत्व त्यांनी करून दाखवले. त्याचे फलित म्हणून मराठी चित्रपटातील अभिनेते मिलिंद शिंदे, मधू कांबीकर, हेमांगी कवी यासारख्या कलाकारांसोबत चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर 'कलर्स' या मराठी वाहिनीवर आदर्श शिंदे सोबत एकदम कडक या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियातील मोस्कोमधून आलेल्या डॉक्टर दिशा यांच्याबरोबर कांताबाईं यांनी सुमारे एक महिनाभर शूटिंग करून आपल्या समाजाच्या व्यथा अडचणी जगभर पोहोचवण्यासाठी विशेष कार्य केले. अशा या महान कलावंतांची अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपजीविका थांबली. पती रमेश जाधव यांच्यासोबत प्रमुख भूमिका बजावणार्या कांताबाईच्या जाण्यामुळे कुटुंबाचं उत्पन्नाचे साधन बंद पडले. चार मुली व तीन मुलं या कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. ही बाब वांबोरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष साहेबराव ठाणगे, सचिव शंकरराव शेवाळे, उपाध्यक्ष आसाराम रहाणे यांच्या निदर्शनास आल्यामुळे जाधव कुटुंबाला सुमारे महिनाभराचा किराणा दिला.