नगर : कर्जत नगरपंचायतीत घनकचरा प्रकल्पामध्ये गैरप्रकार

नगर : कर्जत नगरपंचायतीत घनकचरा प्रकल्पामध्ये गैरप्रकार

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : कर्जत नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पातील प्लास्टिक कचरा बारीक करणारी मशीन आणि ओला कचरा प्रक्रिया मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहेत. असे असतानाही त्यावर नगरपंचायत दर महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये खर्च दाखवून गैरप्रकार केला जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद मेहेत्रे यांनी केला आहे.

शरद मेहेत्रे यांच्यासमवेत विठ्ठल सोनमाळी, आदित्य शिरसागर, सुनील यादव व उमेश जपे हे सर्व जण कर्जत शहरातील कचरा संकलन केंद्रावर गेले होते. तेथे त्यांना दोन शेडमध्ये प्लास्टिक कचरा बारीक करणारी आणि ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारी मशीन दिसली. या मशीन चालू करण्याचा प्रयत्न केला असता, तेथे वीज मीटर आणि वीज कनेक्शनच नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता तेथील कर्मचार्‍यांनी या दोन्ही मशीन बंद असल्याचे सांगितले. ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारी मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहे, तर प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी मशीन आणल्यापासून आजतागायत चालूच केलेली नाही. कर्जत नगरपंचायतीची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मग लाखो रुपये खर्च करून या मशीन आणल्या कशाला? असा प्रश्न त्यांना पडला.

याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविली असता, मुख्याधिकारी आणि लेखापाल यांनी कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी दरमहा एक लाख रुपये ते एक लाख 30 हजारच्या दरम्यान बिल काढले आहेत. म्हणजेच वर्षाला कमीत कमी बारा ते पंधरा लाख रुपये कचर्‍यावर खोटी प्रक्रिया दाखविण्यासाठी मुख्याधिकारी यांनी खर्च केले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुख्याधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून आजतागायत कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. या गैरकारभाराबाबत आवाज उठविणार असल्याचे मेहेत्रे यांनी म्हटले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाची नोटीस

नाशिक विभागीय आयुक्त संजय दुसाने यांनी 11 जुलै 2022 रोजी कर्जत नगरपंचायत मुख्याधिकारी यांना नोटीस बजावून तीन दिवसांत उत्तर मागितले आहे. नगरपंचायतीची घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रगती असमाधानकारक आहे, हे प्रत्यक्ष भेट दिल्यावर दिसून आले आहे, तसेच आपण दरमहा एमआयएसमधील तसेच या कार्यालयाने वेळोवेळी मागितलेल्या माहितीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विषयी बाबी 100 टक्के पूर्ण झाल्याचे नमूद करून आयुक्त कार्यालयाची दिशाभूल केली आहे. या सर्व बाबींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व राष्ट्रीय हरित लवाद यांची नोटीस व दंड भरण्याची निर्देश दिलेले आहेत. असे असतानाही चुकीची माहिती सादर करीत आहात, असे नोटिसीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news