नगर : कर्जत तालुक्यात दोन अपघातांत 2 ठार

नगर : कर्जत तालुक्यात दोन अपघातांत 2 ठार

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील नागलवाडी शिवारामध्ये ट्रॅक्टर भरधाव वेगात मागे घेताना विठ्ठल रमेश शिंगटे (वय 25) या युवकाच्या अंगावर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नगर-सोलापूर महामार्गावर नागमठाण शिवारात खुळ्याचा गोठा परिसरात दोन वाहनांची समोरा-समोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.

नागलवाडी येथील शेतकरी रमेश शंकर शिंगटे यांनी यासंदर्भात कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि.20 जून रोजी त्यांच्या शेतामधील माती ट्रेलरमध्ये भरली आणि हा ट्रेलर ट्रॅक्टरला जोडायचा होता. यावेळी ट्रॅक्टर चालक बळीराम नानासाहेब नलावडे (रा. नागलवाडी) याने ट्रॅक्टर मागे घेताना अविचाराने चालविला. त्या ठिकाणी उभा असलेल्या विठ्ठल शिंगटे याच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्याखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक बळीराम नलावडे हा त्या ठिकाणाहून पळून गेला. याप्रकरणी रमेश शिंगटे यांच्या फिर्यादीवरून रविवारी (दि.26) बळीराम नलावडे याच्याविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेबाबत महेश सोपान डांगे (रा. पुणे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 25 जून रोजी ते आणि त्यांचा मित्र अतुल महादू वाळुंजकर, किरण अरविंद भालेराव हे कारमध्ये (एम एच 14 जे ए 56 94) मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त वाहिरा (ता. आष्टी, जिल्हा बीड) येथे गेले होते. कार्यक्रम संपवून रात्री अकराच्या सुमारास नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील नागमठाण शिवारात खुळ्याचा गोठा परिसरात ते आले. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. या ठिकाणी कच्च्या रस्त्याच्या पुलाजवळ अचानक टेम्पो (एम एच 4 डी डी 8177) नगरकडून मिरजगावकडे येताना दिसला. यावेळी चालक किरण अरविंद भालेराव याने गाडीचा ब्रेक जोरात दाबला. रस्त्यावरील खडीमुळे गाडी घसरून समोरून येत असलेल्या टेम्पोवरवर ड्रायव्हर साईडने जोराने जाऊन धडकली. यामध्ये किरण अरविंद भालेराव हा चालक जागीच ठार झाला.

त्याच्याजवळ बसलेले अतुल महादू वाळुंजकर हे या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे नगरला उपचारांसाठी हालविण्यात आले. फिर्यादी महेश डांगे देखील जखमी आहेत. टेम्पोतील काहीजणांना मार लागला आहे. या प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये मयत चालक किरण भालेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news