नगर : करपडीकरांची पाण्यासाठी वणवण

राशीन : कर्जत तालुक्यातील करपडी येथील कोरडाठाक पडलेला पाझर तलाव. (छाया ः किशोर कांबळे)
राशीन : कर्जत तालुक्यातील करपडी येथील कोरडाठाक पडलेला पाझर तलाव. (छाया ः किशोर कांबळे)

राशीन : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील करपडी येथे दोन वर्षांपासून उन्हाळ्यात कुकडीचे आवर्तन करपडी येथील दोन्हीही पाझर तलावांमध्ये न आल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असे माजी सरपंच व भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील काळे यांनी सांगितले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करपडीला पाणीपुरवठा करणारी विहीरही या पाझर तलावालगतच आहे. त्यावरती संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. सध्या पावसाळा चालू असूनही पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे सदर तलाव कोरडा पडल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांचे व ग्रामस्थांचे हाल होत आहेत, तसेच शासनाकडे टँकरसाठी पाठपुरावा करूनही टँकर उपलब्ध झाला नाही.

शासनाने करपडी गावाच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी सुनील काळे यांनी केली आहे. करपडी येथील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी गोरगरीब जनतेला पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामप्रशासन गावात पाणीपुरवठा करण्यासाठी अपयशी ठरले आहे.

दरम्यान, भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली असून, काही ग्रामस्थांनी पाण्यासाठी पैसे मोजून तहान भागविली आहे. पावसाळ्यात पाण्याचा टँकर सुरू करम्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तालुका प्रशासनाने करपडीच्या पाणीप्रश्नात लक्ष घालून हा पश्न मार्गी लावावा, अशीही विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news