नगर : एकाच रात्रीत चार ठिकाणी चोर्‍या

नगर : एकाच रात्रीत चार ठिकाणी चोर्‍या

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या व घरफोड्या झाल्या असून यासंदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात दोन, तर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये किराणा दुकानासह दोन मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत.

नगर तालुक्यातील कौडगावात भीमा पांडुरंग काळे यांचे प्रवीण किराणा स्टोअर्सच्या पाठीमागील बाजूचा लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. तीन हजारांची रोकड, पाच हजार रुपयांची चिल्लर, दहा हजार रुपये किमतीचे खारीक, खोबरे, बदाम, काजू, संतूर साबण, सिगारेटची पाकिटे, गोडेतेलाचे डबे आदी किराणा माल चोरून नेला. तसेच चोरट्यांनी दुकानात बसविलेले सीसीटिव्ही कॅमेरे, तसेच डीव्हीआर व स्क्रिनही लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री 8 ते बुधवारी (दि. 3) सकाळी 7 या कालावधीत घडली आहे. याबाबत दुकानदार भीमा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

घरफोडीची दुसरी घटना खातगाव टाकळीत मंगळवारी (दि. 2) संध्याकाळी 6 ते बुधवारी (दि. 3) पहाटे 4 या कालावधीत घडली. गावातील तुळजा भवानी माता मंदिर व गोरक्षनाथ मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दोन्ही मंदिरांतील दानपेट्या फोडून सुमारे 45 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. याबाबत काशीनाथ केशव पठारे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कौडगाव व खातगाव टाकळी येथे घरफोड्या झालेल्या असताना हिंगणवगाव व कौडगावातून मोटारसायकलीही चोरीस गेल्याचे समोर आले आहे. कौडगाव येथील अजयनाथ शिवाजी पोतकुले यांची मोटारसायकल (क्र.एम.एच.16, ए.यू.5931) चोरट्याने पळविली.

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील हिंगणगाव येथूनही मोटारसायकल (क्र.एम.एच.16, ए.जी.7361) चोरट्याने पळविली. याबाबत दत्तात्रय नानासाहेब सोनवणे (वय 53, रा. हिंगणगाव) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी

नगर तालुक्यात सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, खरीप पिकेही जोमदार आहेत. नेमका पावसाचा मोका साधून चोरट्यांनी चोर्‍यांचा धडाका लावला असून, नागरिकांत घबराट पसरली आहे. सध्या आर्थिक चणचणीचे दिवस असताना चोर्‍या वाढल्या आहेत. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news