नगर तालुक्यात एकाच रात्रीत 30 शेळ्यांची चोरी

नगर तालुक्यात एकाच रात्रीत 30 शेळ्यांची चोरी

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात गावागावात शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या चोर्‍यांचे सत्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून थांबता थांबेना. सोमवारी (दि.22) मध्यरात्री ते मंगळवारी (दि.23) पहाटेच्या दरम्यान तालुक्यात दोन गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत गोठ्यातून 30 शेळ्या चोरून नेल्या आहेत. यातील 27 शेळ्या कोल्हेवाडी, तर तीन शेळ्या सारोळा कासारमधून चोरी झाली आहे. शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांच्या वाढत्या चोर्‍या पाहता या चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान नगर तालुका पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

नगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यात शेतकर्‍यांची पाळीव जनावरे रात्री गोठ्यातून चोरून नेणार्‍या टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या जर्सी गायी, खिलार बैल, शेळ्या-मेंढ्या आतापर्यंत चोरीला गेल्या आहेत. कधी-कधी एकाच रात्री दोन वेगवेगळ्या गावात चोर्‍या होत असल्यामुळे जनावरे चोरणार्‍या एक नव्हे, तर अनेक टोळ्या असण्याची शक्यता आहे.

डोगर कडेला असलेल्या वस्तीवर डोळा

नगर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात डोंगर कडेला असलेल्या भोसले वस्तीवरील शेतकरी बाळू मोरचूद भोसले यांच्या घराशेजारील बंदिस्त गोठ्यातून चोरट्यांनी 25 शेळ्या चोरून नेल्या. दुसरी चोरी बनकरवस्ती येथे शंकर प्रभाकर बनकर यांच्या घराशेजारील गोठ्यात झाली. या गोठ्यात म्हशींच्या शेजारी बांधलेल्या दोन शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. दोन्ही शेतकरी सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून उठल्यावर त्यांना शेळ्यांची चोरी झाल्याची माहिती समजली. या दोन्ही ठिकाणी झालेल्या चोर्‍या मंगळवारी पहाटे 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान झाल्या असाव्यात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नगर तालुक्यातील सारोळा कासार परिसरातही शेतकर्‍यांच्या जनावरांच्या तसेच शेतीउपयोगी साहित्याच्या चोर्‍यांचे सत्र सुरू आहे. शिवारात असलेल्या बारे मळा परिसरात सोमवारी (दि.22) मध्यरात्री तीन ते चार चोरट्यांनी सारोळा सोसायटीचे उपाध्यक्ष शिवाजी वाव्हळ यांच्या घराशेजारील गोठ्यातून तीन संकरीत शेळ्या चोरून नेल्या आहेत. काळे मळा भागातून मच्छिंद्र नामदेव काळे यांच्या शेतातील शेततळ्यात असलेली पाणबुडी मोटर चोरट्यांनी चोरून नेली.

चोरट्यांनी गलोलीने मारले दगड

नगर तालुक्यातील भोरवाडी शिवारात पाचपटा वस्ती येथील बाळू सावित्रा खैरे या शेतकर्‍याच्या वस्तीवर शनिवारी (दि.20) मध्यरात्री दोन चोरटे आले होते. या चोरट्यांनी खैरे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या गायीचा कासरा सोडत असतांना कुत्र्यांचा भुंकण्याच्या आवाजाने खैरे जागे झाले. घराबाहेर आले असता त्यांनी त्यांच्याकडील बँटरीच्या उजेडात चोरट्यांना पाहुन त्यातील एकाला 'संजु तु इथे काय करतो,'असे विचारून त्यांच्याकडे जाताना दोघा चोरट्यांच्या पैकी एकाने गलोलीच्या मदतीने दगड मारून खैरे यांना जखमी केले. याबाबत खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी आरोपी संजय युवराज काळे व जाकेश संजय काळे (दोघे रा.भोरवाडी शिवार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news