नगर : अन् चोरट्यांनी काढला पळ!

नगर : अन् चोरट्यांनी काढला पळ!

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : रात्रीचे सव्वा बारा वाजलेले. सर्व गावकरी गाढ झोपेत असताना परिसरात चोरटे आले. मात्र, ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे सर्व गावकरी झोपेतून जागे झाले आणि चोरट्यांना गावातून पळ काढावा लागला. त्यामुळे चोरीची संभाव्य घटना टळली.

नगर तालुक्यातील सारोळा कासार गावात मंगळवारी (दि.26) मध्यरात्री ही घटना घडली. गावठाणालगत अस्तगाव रस्त्यावरील वडाचा मळा परिसरात मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास पाच ते सहा चोरटे आले होते. त्यांनी एका घराच्या खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी घरातील वृद्ध महिलेला जाग आली आणि तिने तत्काळ आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारून झोपेतून उठविले. त्यांना घराजवळ चोरटे असल्याचे सीसीटीव्हीत दिसले, त्यांनी तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती असलेले पत्रकार सुनील हारदे यांना ही घटना कळविली. हारदे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून चोरटे आल्याचा संदेश दिला. हा संदेश काही क्षणातच संपूर्ण गावातील नागरिकांच्या मोबाईलवर, तसेच नगर तालुका पोलिस ठाण्यात व्हाईस कॉलद्वारे प्रसारित झाला.

या संदेशाने संपूर्ण गावातील ग्रामस्थ सतर्क झाले. चोरटे गणेशवाडी येथील एका घरासमोर आडोशाला थांबलेले होते. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सानप यांनी संदेश प्रसारित केला. त्यांनी रात्रीची गस्त घालणारी पोलिसांची गाडी सारोळा कासारला पाठविली. मात्र, चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत गावातून पळ काढला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news