नगर : अनधिकृत विद्यार्थ्यांच्या अतिक्रमणावरून महात्मा फुले विद्यापीठात राडा

राहुरी : महात्मा फुले विद्यापिठात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारात ठिय्या मांडला.
राहुरी : महात्मा फुले विद्यापिठात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारात ठिय्या मांडला.

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दगडफेक झाल्याच्या अफवेने विद्यार्थ्यांनी बचावासाठी थेट कुलगुरूंचे कार्यालय गाठले. या गैरप्रकाराची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अनधिकृतपणे विद्यापीठ परिसरात वास्तव्य करणार्‍यांना बाहेर काढत गुन्हे दाखल करण्याचा इशारा शिक्षण विभागाचे सचिव महानंद माने यांनी दिला आहे.

कृषी व शिक्षण क्षेत्राबाबत राज्याला दिशादर्शक असणार्‍या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी अभियंता विभागाकडून पैसे मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होते, तर कधी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या रंगीबेरंगी कार्यक्रमांचे व्हिडीओ प्रसारित होत आहेत. या प्रकारांबाबत विद्यापीठ प्रशासनाची बघ्याची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात आहे. आता विद्यापीठात शेकडो विद्यार्थी अनधिकृत वास्तव्य करीत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. 'आमचा जीव वाचवा' म्हणत विद्यार्थ्यांनी थेट सुरक्षा रक्षकांकडे धाव घेतल्याचा प्रकार घडला आहे.

'पॅरासाईट'चा प्रश्न चिघळला

याबाबत विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विद्यापीठात अनधिकृत प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी रहात असल्याच्या वादातून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाले. रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या वादानंतर विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी सुरक्षा विभागाकडे धाव घेतली. सुरक्षारक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करीत कोणताही अनूचित प्रकार घडू दिला नाही. या गंभीर घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठांना दिली. विद्यापीठ प्रशासन याबाबत उचित निर्णय घेणार असल्याचे शेटे यांनी सांगितले.

विद्यापीठामध्ये सुमारे 500 विद्यार्थी अधिकृतरित्या दरवर्षी 70 हजार रुपये शुल्क भरून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी राहतात. परंतु काही विद्यार्थी अनधिकृतपणे रहात असल्याची चर्चा आहे. त्यानुसार अधिकृतपणे प्रवेश प्रक्रिया करून घेणारे विद्यार्थी व अनधिकृतपणे राहणारे विद्यार्थी या चर्चेतून दोन गटांमध्ये चांगलेच वादंग घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. विद्यापीठ हे कृषी शिक्षणासाठी राज्याला मार्गदर्शक असताना विद्यार्थ्यांकडून घडलेला प्रकार निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत. काही विद्यार्थी अवैधरित्या राहण्यासह मेसच्या जेवणाचा लाभ घेतात, अशी चर्चा झडत आहे. विद्यापीठात परदेशासह परराज्यातील होस्टेलची व्यवस्था आहे.

विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारे दोन गटांमध्ये दगडफेकीच्या घटना घडत असतील, तर विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये सुरक्षेसाठी खर्च केले जातात. तरीही विद्यापीठात विद्यार्थी अनधिकृत प्रवेश करुत वादंग निर्माण करीत असल्यास त्याला जबाबदार कोण? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रहार संघटना करणार आंदोलन

आंतराष्ट्रीय पॅराग्लायडींग खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी वादंग होत असतानाच विद्यार्थ्यांची भेट घेत प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ढूस यांनी सांगितले की, विद्यापीठात शेकडो विद्यार्थी प्रशासनातील काही अधिकार्‍यांना चिरीमिरी देत राहून मेसचाही फायदा घेतात. सुमारे 500 विद्यार्थ्यांकडून वार्षिक 70 हजार रुपये प्रमाणे सुमारे 3.5 कोटी रुपये जमा होतात. या पैशांचा वापर अनधिकृत प्रवेश करणार्‍यांवर केला जात असेल, तर हा मोठा अन्याय आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रहार संघटना विद्यापीठ प्रशासनाच्या या चुकीच्या कारभाराविरोधात आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा ढूस यांनी दिला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कोणत्या न कोणत्या कारणास्तव घडणार्‍या वादंगाबाबत कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, कुलसचिव डॉ. प्रमोद लहाळे यांच्यासह प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवैध विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करणार : माने

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये काही अनधिकृत विद्यार्थी रहात असल्याची माहिती समजली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. दगडफेक झाली असल्यास त्याची सविस्तर चौकशी केली जाईल. अनधिकृत राहणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठ हद्दीत बंदी घातली जाईल. तसेच, पोलिस कारवाई करू, अशी माहिती सचिव महानंद माने यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news