

नेवासा : पुढारी वृत्तसेवा: लग्नाचे आमिष दाखवून शेवगाव तालुक्यातील एका तरुणाने नेवासा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. नेवासा न्यायालयाने 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील किरण नानासाहेब पुंडे (वय 23) याने घरी येऊन मुलीशी जवळीक साधून प्रेम प्रकरण केल्याचे समजले होते. 13 जूनला मुलगी घरात नाही. सरपण आणण्यासाठी गेली. परत आली नसल्याने आम्हाला किरणचा संशय आल्याने त्याच्या राहत्या घरी निंबेनांदूरला विचारपूस करण्यासाठी गेलो असता, त्यांने आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत हाकलून लावले.
15 तारखेला मुलगी घरी आल्यानंतर तिच्याकडे विचारपूस केली असता, पीडित मुलीने आपणास किरणने पुण्याला लग्न करण्यासाठी बोलवून पुण्याच्या बसस्थानकावर वर येऊन मी काम करून तुला नेण्यासाठी परत येतोे, असे सांगून तो परत आलाच नाही. मी बसस्टॉपवरच दोन दिवस थांबून घरी आल्याचे पीडिताने आईला सांगितले. आणखी विश्वासात घेऊन विचारले असता, किरणने गेल्या वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून शेवगाव, पांढरीपुलवरील लाँजवर अत्याचार केल्याचे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नेवासा न्यायालयाने 20 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे हे करित आहेत.