नगर : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून 85 हजार 189 प्रवेश निश्चिती करण्यात आली आहे. चांगले शिक्षण आणि भौतिक सुविधा असणार्या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील 128 कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक भौतिक सुविधा नसल्याने त्यांच्या अकरावीच्या प्रवेश क्षमतेला कात्री लावली आहे. त्यामुळे 12 हजार 626 जागा प्रवेश प्रक्रियेतून कमी करण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी घेतला आहे.
जिल्ह्यातून दहावीला 68901 विद्यार्थी होते. यापैकी 66549 उत्तीर्ण झालेले आहेत. हे सर्व विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र आहेत.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी 20 जून ते 8 जुलै या कालावधीत माध्यमिक संलग्न, स्वतंत्र आणि उच्च माध्यमिकमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता आणि प्रत्यक्षात तेथील भौतिक सुविधांची तपासणी हाती घेतली होती.
शासकीय यंत्रणेमार्फत ही तपासणी झाली. यामध्ये जागा मालकी, विद्यालयाचे मैदान, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, विद्यार्थी बैठक व्यवस्थेची तपासणी झाली. त्यात अनेक कनिष्ठ विद्यालयांत त्रुटी आढळून आल्या. दरम्यान, शिक्षण विभागाने 128 विद्यालयांतील प्रवेश क्षमता कमी केली आहे. मात्र, संबंधित कनिष्ठ विद्यालयांना 14 जुलैपर्यंत हरकती मागाविण्यात आल्या आहेत. त्यावर समाधान झाल्यास त्यांची प्रवेश क्षमता पुर्ववत केली जाणार आहे.
मध्यंतरी स्वयंअर्थसहायित विद्यालयांनी 11 वी प्रवेशासाठी मान्यता घेऊन ठेवली होती. मात्र, प्रत्यक्षात शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत माध्यमिक संलग्न अशा 30 आणि स्वतंत्र 7 अशा 37 विद्यालयांत 11 वीचे वर्गच सुरू नसल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्ह्यात माध्यमिक संलग्न अशा 356 कनिष्ठ विद्यालयात अकरावीचे प्रवेश दिले जातात. यापैकी 229 विद्यालयात भौतिक सुविधा निदर्शनास आल्या, तर 97 विद्यालयात विद्यार्थी प्रवेश क्षमता आणि भौतिक सुविधा यामध्ये त्रुटी आढळून आल्याने तेथील प्रवेश क्षमतेला कात्री लावण्यात आली. अशाचप्रकारे स्वतंत्र दर्जा असलेल्या 83 विद्यालयांपैकी 45 विद्यालय भौतिक सुविधेस पात्र ठरले, तर उर्वरीत 31 विद्यालयांच्या प्रवेशांमध्ये कपात करण्यात आली.