नगर : 44 हजार निराधार आर्थिक विवंचनेत

नगर : 44 हजार निराधार आर्थिक विवंचनेत
Published on
Updated on

नगर, दीपक ओहोळ : केंद्र सरकारकडून यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेमुळे जिल्ह्यातील विधवा, अपंग, वृध्द आदी तब्बल 44 हजार 542 निराधार व्यक्तींचे जगणे अवघड झाले आहे. अनुदानाची वाट बघण्यातच या निराधारांचा रोजचा दिवस आशेने उगवत आणि निराशेने मावळत आहे.

देशभरातील गोरगरिब, विधवा, परितक्त्या, वृध्द अशा निराधारांचा उदरनिर्वाह चालावा, या उदात्त हेतूने केंद्र सरकारच्या वतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ या योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अनुदान दिले जात आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एका वेळेस 20 हजार रुपये अनुदान दिले जात आहे.

या निवृत्तीवेतनामुळे अपंग, विधवा व वृध्द लाभार्थ्यांची आर्थिक गरज काही प्रमाणात भागवली जात आहे. जिल्ह्यात आजमितीस इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे 2 हजार 178, राष्ट्रीय अपंगचे 111, वृध्दापकाळ योजनेचे 42 हजार 118 तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे 135 लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे जिल्ह्याचे कामकाज पाहणारे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्र सरकारकडून या योजनांच्या लाभाधारकांना देण्यासाठी एक पैसाही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून वृध्द नागरिकांचा दवाखाना व औषधपाणी बंद आहे. घरगुती गॅस टाकी, तेल, भाजीपाला महागला असून, वाढत्या महागाईमुळे या निराधारांचे जगणे अवघड झाले आहे.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना राज्य सरकारच्या वतीने राबवली जात आहे. जिल्ह्यात श्रावणबाळ योजनेचे 1 लाख 28 हजार 214 तर संजय गांधी निराधार योजनेचे 53 हजार 412 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना प्रतिमहा 1 हजार रुपये अनुदान उपलब्ध केले जात आहे. राज्य शासनाकडून जून महिन्याचे अनुदान उपलब्ध झाले आहे. केंद्र सरकारकडून अद्याप अनुदान उपलब्ध झाले नसल्यामुळे विधवा, अपंग व वृध्द या निराधार व्यक्तींची आर्थिक तारांबळ सुरू आहे. प्रशासन याबाबत पाठपुरावा करीत असले, तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील या प्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी वाटप केले 228 कोटी

श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे जिल्ह्यात एकूण 1 लाख 81 हजार 700 लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून दरमहा एक हजार रुपये अनुदान अदा केले जात आहे. गेल्या 2021- 22 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात अनुदानापोटी 228 कोटी रुपये वाटप करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news