

नगर, पुढारी वृत्तसेवा : जल जीवन मिशन अंतर्गत गावागावात प्रति माणशी 55 लिटर प्रमाणे बाराही महिने स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण गावात योग्य अंमलबजावणी झाल्यानंतर आता संबंधित गाव 'हर घर जल' घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठी गावात जावून ग्रामसभा घेणे, शासनाच्या पोर्टल, मोबाईल अॅॅपवर नोंदणी करणे, अशी कामे करण्यात येणार आहेत.
नगर जिल्ह्यातील 229 गावे 100 टक्के नळ जोडणी पुर्णत्वाकडे आहे, जी गावे हर घर जल म्हणून घोषित होतील, त्या गावात हर घर जल महोत्सव साजरा करण्यात यावा, असे निर्देश जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुरेश शिंदे यांनी दिले आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत जी गावे 100 टक्के नळ जोडणी झालेली आहे, तसेच 55 एल.पी.सी.डी प्रमाणे गुणवत्ता पुर्ण पाणी पुरवठा होत आहे, अशी गावे 'हर घर जल' म्हणुन घोषित केली जात आहे. याबाबतची कार्यपध्दती आणि जेजेएम-आयएमआयएस पोर्टल व मोबाईल अॅॅपवर अपलोड करण्यासंबधी व सर्वे एजन्सी(पी.एस.सी) ने केलेले एस्टीमेट व डीपीआर तपासणीबाबत एक दिवशीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यशाळेस कार्यकारी अभियंता आनंद रुपनर, उपअभियंता विठ्ठल माने, सुनील साळुंके, श्रीरंग गडधे, रवींद्र पिसे आदी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता रूपनर, संनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार रवींद्र ठाणगे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दिपाली जाधव, अश्वीनी जाधव, राहुल झिने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.