नगर : 170 गावांसाठी अवघ्या 18 एसटी बसेस

नगर : 170 गावांसाठी अवघ्या 18 एसटी बसेस
Published on
Updated on

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर आगारात मंजूर असलेल्या 56 बसेसपैकी 12 एसटी बसेस कोकणातील गौरी गणपती उत्सवासाठी 8 बसेस विभागीय कार्यशाळेत दुरुस्तीला तर 17 बसेस मोठ्या शहरातील प्रवासी वाहतुकीसाठी पाठविल्यामुळे संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात तब्बल 170 गावांसाठी अवघ्या 18 बसेस शिल्लक राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालये, हायस्कूल व शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी मासिक पास काढूनही, एसटी बसेस वेळेत येत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. संगमनेर आगारातील अधिकार्‍यांच्या नियोजनाविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

संगमनेर आगारात सद्यस्थितीला 2 शिवशाही, 2 विठाई, 2 निमआराम आणि उर्वरित 42 सध्या अशा एकूण 56 एसटी बसेस आहेत. यापैकी 8 बसेस विभागीय कार्यशाळेकडे दुरुस्तीसह इतर कारणांसाठी पाठविलेल्या आहेत. 12 बस कोकणातील गौरी, गणपतीसाठी पाठविलेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर आगारामध्येसद्यस्थितीला केवळ 36 एसटी बसेस शिल्लक आहेत. यातील पुणे- नाशिकसाठी संगमनेर आगारातून दररोज सर्वसाधारण 10 फेर्‍या होतात. या फेर्‍यांसाठी 7 बसेस लागतात.

संगमनेर ते नगर दिवसाला 6 फेर्‍या होतात. यासाठी 6 बसेस तर अकोलेच्या दिवसातून 13 फेर्‍या होतात. यासाठी 4 अशा एकूण 17 बसेस जातात. उर्वरित फक्त 18 बसेस संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी आगारामध्ये शिल्लक राहिल्या आहेत. यातील 4 बसेस पंढरपूर, बारामती, गोंदवले (शिखर शिंगणापूर) व औरंगाबाद शहरांसाठी सोडल्या जात आहेत. पुणे- नगर व नाशिक या मोठ्या शहरांत अनेकजण नोकरी, शिक्षण व व्यापारानिमित्त प्रवास करतात. त्यांच्यासाठी 17 बसेस पाठविल्या जातात.

मुंबईच्या सर्व फेऱ्या रद्द!

संगमनेर आगारामध्ये बसेसचे प्रमाण कमी असल्यामुळे संगमनेर ते मुंबई जाणार्‍या सर्व एसटी बसेसच्या फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईला खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेस रात्रीच्या वेळी संगमनेर आगाराच्या प्रवेशद्वाराजवळच भरल्या जातात, याकडेसुद्धा महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या या दुर्लक्षाचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या निमआराम बसेस वाल्यांना होत आहे.

अगोदरच ग्रामीण भागात कमी बसेस असल्यामुळे त्या वेळेवर सुटत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गामधून संगमनेर आगाराच्या अधिकार्‍यांविषयी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता कोकणामध्ये साजरा होणार्‍या गौरी, गणपतीसाठी संगमनेर आगारातून 12 बसेस गेलेल्या आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागामधून महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांनी अगोदरच मासिक पास काढले आहेत, मात्र त्यांना महाविद्यालयात येण्यासाठी व पुन्हा घरी जाण्यासाठी वेळेवर एसटी बसेसची सुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांचा मासिक पास नाहक वाया जात आहे. एसटीची सेवा मिळतच नसेल तर मासिक पास काढून तरी उपयोग काय, असा संतप्त सवाल विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील अनेक अंध, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये सवलत दिली असल्यामुळे तेही एसटी बसनेच प्रवास करतात, परंतु एसटी वेळेवर येत नाही. त्यामुळे त्यांना या एसटी बसेसचा काहीच उपयोग होत नसल्याची खंत अंध अपंग व ज्येष्ठ व्यक्त करतात.

आगारात बसेस कमी..!

संगमनेर आगारामध्ये एसटी बसेस कमी असल्यामुळे प्रवासी वर्गावर ताण पडत आहे. त्यामुळे अ.नगर येथील विभागीय कार्याल याकडे संगमनेर आगारासाठी पाच ते दहा बसेस उपलब्ध करून देव्यात, अशी मागणी दोन महिन्यांपूर्वी विभागीय कार्यालयाकडे केली, मात्र अद्याप एकही बस उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे आहे त्या बसेसमध्ये प्रवासी वाहतूक करावी लागत असल्याचे संगमनेर आगाराचे आगार व्यवस्थापक निलेश करंजकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news