

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 1494 शाळांमध्ये अद्याप पोषण आहार पोहचलेला नाही. 20 तारखेच्या आत संबंधित शाळेत पोषण आहाराचा माल पोहच झालाच पाहिजे, असे आदेश सीईओ आशिष येरेकर यांनी ठेकेदार कंपनीला दिले आहेत.
यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी थाटामाटात प्रवेशोत्सव सुरू असताना, काही शाळांमध्ये मात्र पोषण आहार नसल्याने मुले अक्षरशः उपाशी राहिले.
याकडे दै. पुढारीने सीईओंचे लक्ष वेधले होते. त्यानंतर, काल सकाळी सीईओ येरेकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेताना शिक्षण विभागाची तातडीचे बैठक बोलावली. त्यात कोणकोणत्या शाळेत आहार पोहचलेला नाही, याबाबत माहिती घेतली असता 4552 शाळांपैकी 1494 शाळांना आहार मिळाला नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे सीईओंनी संबंधित ठेकेदाराशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत 20 तारखेच्या आत सर्व शाळांवर धान्यादी माल पोहच झाला पाहिजे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सक्त सूचना केल्या आहेत. दरम्यान, 1494 पैकी काही शाळांमध्ये जुना आहार शिल्लक आहे. तिथे अडचण येणार नाही, मात्र ज्या शाळांमध्ये जुना माल नाही आणि नवाही आलेला नाही, अशा शाळेतील विद्यार्थ्यांना अजुन काही दिवस तरी आहाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शालेय पोषण आहारासंदर्भात 'पुढारी'च्या बातमीचा संदर्भ घेवून शिक्षण विभागाच्या अधिकार्यांमसेवत सकाळी बैठक घेतली. ज्या शाळांना जुन-जुलैचा आहार अद्याप पोहचलेला नाही, तेथे 20 तारखेपूर्वी तो पोहच करावा, अशा सूचना संबंधित पोषण आहार ठेकेदाराला केल्या आहेत.
-आशिष येरेकर, सीईओ झेडपी