जामखेड : चौंडीच्या विकासासाठी सात कोटी, आ. रोहित पवारांचा पाठपुरावा
जामखेड : पुढारी वृतसेवा : तालुक्यातील चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासासाठी राज्य सरकारकडून आता अतिरिक्त सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमावेळी विविध प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील, असा शब्द आमदार रोहित पवार यांनी जनतेला दिला होता. यानंतर त्यांनी अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी चार कोटींचा घाट मंजूर करून आणत त्याचे कामही सुरू केले आहे. विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासासाठी राज्य सरकारकडून आता अतिरिक्त सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचे संग्रहालय, जन्मस्थळी असलेल्या सीना नदीच्या घाटाचे काम व सुशोभीकरण करणे, चौंडीला दोन नवीन कमानी उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.