

सोनई : पुढारी वृत्तसेवा: सासरी नांदताना शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या सहाजणांविरूद्ध शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबद विष्णू रावसाहेब गाडेकर (वय 46, धंदा-शेती, रा. लाखेफळ, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी सोनम संदीप भाकड (वय 22, रा. रस्तापूर, ता. नेवासा) हिचे लग्न 5 फेब्रुवारी 2014 रोजी संदीप आसाराम भाकड यांच्याशी लाखेफळ येथील राहते घरासमोर झाले होते.
त्यांना दोन अपत्ये झाली. विवाहानंतर पहिली तीन वर्षे मुलगी सोनम हिस चांगल्या प्रकारे नांदविले. सन 2017 पासून सासरच्यांनी मानसिक, शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी घर बांधण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. सोनमची सासू जिजाबाई आसाराम भाकड व पती संदिप भाकड या दोघांनी मिळून मानसिक व शारिरीक छळ केला. संदिपला दारूचे व्यसन असल्याने तो मुलीस दारू पिऊन त्रास देऊन चारचाकी वाहन घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करीत होता.
सन 2017 पासून सासू जिजाबाई आसाराम भाकड, पती संदिप आसाराम भाकड, नंदावी दादासाहेब उत्तम शिरसाठ, नणंद अनिता दादासाहेब शिरसाठ, नंदावी रामा कचरु डुकरे, नणंद सुनिता रामा डुकरे यांनी वेळोवेळी सोनमला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्यामुळे तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात सासरच्या सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी संदीप भाकड यास अटक केली.