चिंचपूर पांगुळमध्ये भर दुपारी घरफोडी
चिंचपूर पांगुळ : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील वडगाव रस्त्यालगतच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, तसेच दागिने असा ऐवज काल रविवारी (दि.20) दुपारी तीन वाजता चोरट्यांनी लांबविला. कानातील झुंबर, मंगळसूत्र, डोरले, नाकातील नथ आदी अंदाजे दोन ते तीन तोळे सोन्याचे दागिने, तसेच 5 हजार 750 रुपये रोख रक्कम अशा ऐवजाची चोरी केली. रविवारी बुवासाहेब दामू बडे व परिवारातील सदस्य हे सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेले असताना दुपारी तीन वाजता ही घरफोडी करण्यात आली.
बडे हे सायंकाळी शेतातून घरी आले असता, सदर खोलीचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. घरात जाऊन पहिले असता, त्यांना घरातील सुटकेस, कपडे व इतर वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यातील दागिने व रोख रक्कम गायब करण्यात आला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी जोगेवाडी येथील गिन्यांदेव शिरसाठ या शेतकर्याचे घर दुपारी फोडून दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जोगेवाडी, चिंचपूर पांगुळ, वडगाव परिसरात याआधीही अनेकदा चोरीच्या घटना घडल्या असून, त्याचा तपास लागलेला नाही.

