चन्या बेग गँगकडून पोलिसांना शिवीगाळ..!
राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथे नाशिक येथील मुस्लीम धर्मगुरू ख्वाजा सुफी जरीफ यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. संबंधित आरोपींची भेट घेण्यासाठी आलेला चन्या बेग व त्याच्या साथीदारांची पोलिसांची झटापट झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली. पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालय परिसरात हजर झाला होता. पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला.
राहुरी पोलिसांनी नाशिक येथील धर्मगुरू ख्वाजा चिश्ती यांच्या हत्येतील पोलिसांना हवे असलेले आरोपींना शिताफीने पकडून गजाआड केले. या घटनेतील तिन्ही आरोपींना राहुरी न्यायालयात नेले असता तेथे आरोपी चन्या बेग व त्याचे तीन साथीदार हजर झाले. याबाबत पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बेग व त्याचे साथीदार हे हत्याकांड प्रकरणातील आरोपींशी बोलत होते. त्यावेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे व पेालिसांनी बोलण्यास मनाई केली. यावरून पोलिस व बेग गँगमध्ये वादावादी झाली. पोलिसांना शिवीगाळ करीत दमदाटी दिल्यानंतर पोलिसांच्या फौजफाट्याने तात्काळ बेग व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपींना पकडून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक दराडे यांनी सांगितले. पोलिसांवरील हल्ल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले.

