

लोणी : पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागात बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करून शाळा-महा विद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होत असलेली अडचण दूर करा, अशी मागणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. कोविड संकटात ग्रामीण भागातील बससेवा बंद ठेवण्यात आल्याने सामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. नियम शिथिल झाल्यानंतर शहरी भागातील बससेवा सुरळीत झाली.
परंतु ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा लाभ मिळू न शकल्याने जनतेचे अतोनात हाल होत आहेत. एस. टी. कामगारांनी पुकारलेल्या संपाचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. संप मिटून खूप दिवस झाल्यानंतरही ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू न केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत असल्याची बाब निदर्शनास आणून देतानाच ग्रामीण भागाबाबत असा दुजाभाव का? असा प्रश्न आ. विखे पाटील यांनी उपस्थित केला.
ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच रोजंदरीवर जाणारे कामगार, रुग्ण यांचे हाल होत असून, बस सुविधा उपलब्ध नसल्याने काही खासगी वाहनचालक सामान्य प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याची बाब आ. विखे पाटील यांनी परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
पुढील आठवड्यात सर्व शैक्षणिक संस्था सुरू होत असल्याने ग्रामीण भागातून येणार्या विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण होण्यासाठी बससेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.अनेक गावांत आजही वर्षानुवर्षे रात्री मुक्कामाला जाणार्या बसगाड्या सकाळी शाळा महाविद्यालयात, तसेच कामावर जाण्याच्या दृष्टीने सोयीच्या असतात. ग्रामीण भागातील बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्यास याचा मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय करावा, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील बस सुरू होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी, नागरिक ग्रामस्थांनी व्यक्तीश: भेट घेवून बस सेवा तातडीने सुरू करण्याबाबतची मागणी केली आहे, तसेच संप मिटल्यानंतर एस. टी. कामगारांना अद्यापही फेर्यांची उपलब्धता करुन दिली जात नाही. प्रवाशांची मागणी असतानासुध्दा परिवहन विभागाकडून होत असलेले दुर्लक्ष अतिशय दुर्दैवी आहे.