

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा, या मागणीसाठी सदस्यांनीच ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जेऊर ग्रामपंचायतीत गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविकास अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत ग्रामसेवक राहुल गांगर्डे यांच्याकडे जेऊरचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. गांगर्डे यांच्याकडे जेऊरबरोबरच इमामपूर, धनगरवाडीचा पदभार आहे. एक ग्रामसेवक तीन गावांचा पदभार सांभाळत असल्याने जेऊर गावासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध राहत नाही.
त्यामुळे गाव विकासाची कामे, तसेच नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात आला.
ग्रामपंचायतची गुरुवारी (दि.18) मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून जोपर्यंत कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत बंद ठेवण्याच्या ठरावाची सूचना योगेश पाटोळे यांनी मांडली. त्यास दिनेश बेल्हेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुसा शेख, गणेश तवले, गणेश पवार, मीना पवार, निता बनकर, वैशाली पाटोळे, आश्विनी वाघमारे उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकार्यांची पदे रिक्त
नगर तालुक्यात ग्रामविकास अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. आवश्यकतेपेक्षा ग्रामविकास अधिकार्यांची संख्या कमी आहे. रिक्त पदे भरल्यानंतर ही समस्या मार्गी लागेल. त्यामुळे जेऊर येथे ग्रामसेवकाकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी सांगितले