

खेड : पुढारी वृत्तसेवा : 'मनात आलं, तर मतदानातून नेत्यांना चितपट, तर कधी डोक्यावर घेणार्या खेड गावातल्या एका बहुचर्चित अर्धवट रस्त्याची ग्रामस्थांमधून सध्या जोरदार चर्चा आहे. याला कारणही तसेच आहे. या रस्त्याचे उद्घाटन माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोघांनीही मोठ्या थाटात केले आहे. मात्र, उद्घाटन केलेल्या या रस्त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य पाच वर्षांपासून दोघांच्याही नशिबात नाही.
खेड ग्रामपंचायत अंतर्गत सन 2018 साली खेड राज्यमार्ग ते आगवणवस्ती हा एक किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. त्यावेळी तब्बल 87 लक्ष रुपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध झाला होता. माजी मंत्री राम शिंदे यांनी उद्घाटन केले; मात्र या रस्ता कामाचा प्रारंभ खेड राज्यमार्गापासून न करता तो शेवटच्या दिशेने करावा अशी मागणी ग्रामस्थांनी तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती. तर, काही ग्रामस्थांच्या मते उलट दिशेने काम न करता राज्यमार्गापासून काम व्हावे, अशी मागणी केली होती.
या रस्त्याचे काम शासकीय निविदेप्रमाणे राज्यमार्गापासूनच व्हावे यासाठी काही ग्रामस्थांनी माजी मंत्री राम शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.संबंधित कार्यालयाकडे त्याबाबत लेखी तक्रारीही करण्यात आल्या. यानंतर हे काम भूमिपूजन होऊन 'जैसे थे' राहिले. ग्रामस्थांचे म्हणणे लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यावर हा रस्ता पुन्हा फेरसर्वेक्षण करून शासन निर्णयानुसार पूर्ववत करून घेतला. त्यानंतर या रस्त्याचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुन्हा एकदा भूमिपूजन झाले.
भूमिपूजनानंतर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काम सुरूही झाले. मुरूम, माती, सिमेंट पाईप आणून खडीकरणही झाले; पण हे काम तालुक्यातील एका ठेकेदाराने केले असून, काम निकृष्ट असल्याचा आरोप करत या कामाच्या दर्जाबाबत कडाडून विरोध झाला.
दोघांनाही तिढा सुटलेला नाही माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोघांनाही आजतागायत हा तिढा सुटू शकला नाही. आता, माजी मंत्री शिंदे यांच्या रूपाने मतदार संघाला आणखी एक आमदार मिळाला आहे. आता तर दोन आमदार सांगा अर्धवट काम कधी पूर्ण होणार? असा सवाल खेड ग्रामस्थ विचारत आहेत.