

कोल्हार खुर्द : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत कोल्हार खुर्द बाजारपेठेतील तब्बल पाच दुकाने फोडल्याने व्यापार्यांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, तीन चोरटे दुचाकीवरुन असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसत आहे. कोल्हार खुर्द येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील साईतेज मेडिकलचे शटर वाकवून गल्ल्यातील चिल्लर व नोटा असे 1 हजार रुपये लांबविले.
नगर- मनमाड महामार्गालगत रामेश्वर क्षीरसागर यांच्या किराणा दुकानातून चिल्लर व नोटा असे चार हजार रुपये चोरले. सावता बचत गटाचे सावता कृषी सेवा केंद्र व शेतकरी कृषी सेवा केंद्रातही चोरट्यांनी हात मारला. सागर शिंदे यांचे कृष्णा मोबाईल दुकान फोडून पंधरा हजारांचे मोबाईल चोरले. चोरट्यांनी कोल्हार खुर्द येथे दुचाकी चोरली, परंतु गस्तीवरील पोलिस गाडीचा सायरण वाजल्याने चोरट्यांनी दुचाकी तांदुळनेर शिवारात सोडली. कोल्हार खुर्द परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे, अशी प्रतिक्रिया गावकर्यांकडून ऐकू येत आहे.
डाळींब चोरणारी टोळी जेरबंद
कोल्हार खुर्द परिसरात डाळिंब चोरांनी उच्छाद मांडला आहे. अनापवाडी, तांदुळनेर परिसरात चार चाकी वाहनांतून डाळिंब चोरणारी टोळी तीन दिवसांपूर्वी कानडगाव घाटात पो. उ. नि. फोंडे यांच्या पथकाने पकडली. हे चोरटे त्याच टोळीतील आहेत की काय, याचा तपास करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.