

खेड : विजय सोनवणे : सोशल मीडियाच्या जमान्यात कधी काय व्हायरल होईल याबाबत काय सांगता येत नाही. त्यातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गाजलेला व्हाईसकॉलचा डायलॉग आता गाण्यातून चक्क लग्नाच्या वरातीत हवा करू लागला आहे. तरुणाई यावर जल्लोषात ठेका धरू लागली आहे.
खेड (ता.कर्जत) येथे नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. पण या विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या वरातीत चक्क 'काय झाडी..काय डोंगार..काय हाटील' हे गाणं वाजू लागल्याने नवरदेवाने थेट डिजेवर चढून आनंद व्यक्त केला. शहाजीबापू पाटील अन्य बंडखोर आमदारांसोबत सुरतमार्गे आसामची राजधानी गुवाहाटीला गेले होते.
दोन-तीन दिवस 'नॉट रिचेबल' राहिल्यानंतर त्यांनी त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या सांगोल्यातील कार्यकर्त्याला फोन करून माणदेशी भाषेत तिथल्या निसर्गाचं वर्णन केले होते. या फोनकॉलमुळे त्यांच्या या संवादाला अक्षरशः जगभरात डोक्यावर घेण्यात आले. या संवादाची सध्या अनेक गीते बाहेर पडू लागली आहेत. काही 'रॅप साँगही' तयार करण्यात आले आहे.
हा संवाद इतका गाजला की, गेल्या 10 दिवसांपासून सर्व सोशल माध्यमांवर प्रत्येकजण स्वतःचा झाडीत, हॉटेलात, डोंगराच्या सानिध्यात असलेला फोटो अपलोड करून त्याला 'काय झाडी, काय डोंगार,काय हाटील' असे कॅप्शन देऊन धमाल करत आहेत.
हा संवाद आता सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता लग्न सोहळ्यात वाजणार्या डीजेच्या गाण्यातही आला आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यात होणार्या शुटिंगमध्येही हे गाणे कायमचे कैद होणार आहे.