

कर्जत : विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी कर्जत बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी भाजप किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी केली. कर्जत तालुक्यातील सर्व शाळा कॉलेज सुरू झाले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी कर्जतमध्ये येत आहेत. शाळा सुटल्यानंतर किंवा भरताना कर्जत बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी व विद्यार्थी जमलेले असतात.
यावेळी अनेक टारगट मुले बसस्थानक परिसरात मुलींची छेड काढतात. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कर्जत बस स्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी वाहतूक नियंत्रक यांच्यासोबत चर्चा केली. एसटी महामंडळाने बसस्थानकावर पुढील आठ दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जर, याबाबत निर्णय झाला नाही, तर भाजपकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा यादव यांनी दिला.