

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा : शेत पाणंद रस्ते शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणार्या साधनांची निवड करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी तसेच इतर कामे यंत्रांद्वारे होेतात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्यासाठी बारमाही शेत-पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्यासाठीच रोहयो अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत असून, कोट्यवधींची कामे होत आहेत.
या योजनेतंर्गत कर्जत व जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व राज्य सरकारच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शेत पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच आता नवीन खडीकरणाच्या वर्क ऑर्डर देण्याचे काम सुरू आहे. जामखेड तालुक्यातील 58 कामांसाठी एकूण 16.5 कोटी, तर कर्जत तालुक्यातील 91 कामांसाठी 21 कोटींच्या आसपास निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. जामखेड तालुक्यात यंदाच्या वर्षीची मंजूर मातीकामांच्या पाणंद रस्त्यांची 376 कामांपैकी 200 पेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत.
कर्जत तालुक्यातील 372 कामांपैकी 110 हून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर उर्वरित कामेही प्रगतीपथावर आहेत. शेत/पाणंद रस्ते योग्य असल्यामुळे शेतकर्यांना ये-जा करणे सोपे होते. शिवाय एखादी वस्ती पाणंद रस्त्यावर असेल तर त्या ठिकाणी रुग्णवाहिका जाण्यासाठी व इतरही काही घटना घडल्यास त्या रस्त्यांमुळे मदत पोचवणे सोपे होते. याबरोबरच शेत रस्ता चांगला असेल तर व्यापारी शेतातून माल खरेदी करत असताना देखील त्याला चांगला भाव देतात. ज्याचा थेट आर्थिक फायदा हा शेतकर्यांना होताना पाहायला मिळतो.