

गणेश जेवरे :
कर्जत : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रस्थापित नेत्यांना निवडणुकीपूर्वीच आरक्षणामुळे धक्का बसला आहे. एकूणच तालुक्यातील जिल्हा परिषदेचे राजकारणात राजकीय भूकंप झाल्यासारखे आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात उलथापालथ झाली असून, आता सर्व मदार पंचायत समितीच्या 10 गणांवर असल्याचे दिसून येते. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर झाले.
या आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी तीन गट आरक्षित झाल्यामुळे या गटातील प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय फेरबदल होणार असल्याचे दिसून येत आहेे. तालुक्यातील पंचायत समितीच्या 10 गणाचे आरक्षण कर्ज तहसील कार्यालयात काढण्यात आले. तालुक्यातील मिरजगाव गट अनुसूचित जाती महिला, कोरेगाव गट अनुसूचित जाती व चापडगाव अनुसूचित जाती, असे आरक्षण झाले आहे. त्यामुळे या गटामधील अनेक प्रस्थापित मातब्बर नेत्यांना जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्याची संधी हुकली. तालुक्यातील मिरजगाव, कोरेगाव व चापडगाव गट प्रस्थापित नेत्यांचे होते.
या ठिकाणी आरक्षण निघाल्यामुळे तालुक्यातील राजकीय चित्र आणि समीकरण आगामी काळामध्ये बदलणार आहे. यापूर्वी तालुक्यामध्ये कधीही अशा पद्धतीने तीन जिल्हा परिषद गट एकाच वेळी आरक्षित झालेले नव्हते. निवडणुका जाहीर होणार असल्याचे पाहून अनेक इच्छुकांनी गटामध्ये गाठीभेटी घेऊन मोर्चे बांधणी केली होती. मात्र, अचानक आरक्षण निघाल्यामुळे इच्छुकांना ही मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसला आहे. सर्वात लक्षवेधी असणारा तालुक्यातील कुळधरण जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण निघाला आहे. यामुळे या गटात मोठी चुरस पाहायला मिळेल.
राष्ट्रवादीचे विद्यमान उपसभापती राजेंद्र गुंड यांचे 25 वर्षांपासून या गटावर वर्चस्व आहे. तालुक्यातील राशीन जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. यामुळे या गटातही इच्छुकांना धक्का बसला आहे. यामुळे आता अनेकांना मिस्टर ऐवजी श्रीमतीजींना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. यामुळे राशीन जिल्हा परिषद गटावर होम मिनिस्टरचे वर्चस्व राहिल.
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गटाचे आरक्षण निघाले आहे यामुळे अनेकांच्या निवडणुकी लढवण्याच्या अडचणी निर्माण झाले आहेत. घड्याळाच्या काट्याप्रमाणे गट रचना झाली नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्याची किंमत मोजावी लागली हे सर्व करताना अधिकार्यांनी काय नियम लावले, हे त्यांनाच माहिती.
– श्याम कानगुडे, राष्ट्रवादी
जिल्हा परिषदेचे आरक्षण धक्कादायक असून, ज्या पद्धतीने गट आणि गण रचना केली होती ती पूर्णपणे चुकीची केल्यामुळे त्याचा फटका तालुक्यातील सर्व राजकीय प्रमुख आणि मतदारांना बसला आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे गट आणि गण रचना करण्याची घोषणा असताना घड्याळाचे काटे तालुक्यात उलटे फिरले आहेत.
– काकासाहेब तापकीर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी