कर्जत : कापड बाजारातही आता ‘यादव पॅटर्न’

कर्जत : कापड बाजारातही आता ‘यादव पॅटर्न’
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  शहरात गर्दीने गजबजलेल्या रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा प्रयोग राबवत कर्जतकरांना दिलासा मिळवून दिला. आता कापड बाजारातील अस्ताव्यस्त वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी नायलॉन दोरीचा प्रयोग राबवला. त्यामुळे येथील सर्व व्यापार्‍यांनी पोलिस निरीक्षक यादव यांचा त्यांचा सन्मान केला.
सणासुदीच्या दिवसांत येथील कापड बाजारात मोठी गर्दी असते. त्यामुळे असंख्य अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांनी हा रस्ता अक्षरशः ठप्प होतो. यावर आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्याने हा प्रश्न कायम भेडसावत होता.

शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांवरील वाहतूक नियंत्रणात आणल्याने आता कापड बाजारातील गर्दीचा प्रश्न हाती घेत पोलिस निरीक्षक यादव यांनी सर्व व्यापारी बांधवांची बैठक घेतली.तेथील अडचणी समजून घेतल्या. सर्वांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर काही प्रमाणात पुढे लावलेली दुकाने पोलिसांनी पाठीमागे घेतली आणि कर्जत पोलिसांनी नायलॉन दोरी रस्त्यावर लावून त्या दोर्‍या लोखंडी खिळ्याने सम अंतरावर कायमच्या बसवल्या आहेत.आता या ठिकाणी नायलॉन दोरीचा प्रयोग करून ही सर्व वाहतून नियंत्रणात आणली आहे.

कापड बाजारात सर्व वाहने एकाच रेषेत उभी राहणार असून, जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही. त्याला आर्थिक दंड, तसेच वेळप्रसंगी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येक व्यवसायिकाने आपल्या दुकानासमोर येणारी वाहने पार्किंगमध्ये लावून घेण्याचा आग्रह धरण्याच्या सूचना यादव यांनी केल्या. आलेल्या नागरिकांनाही नियमांचे पालन करण्यासाठी तंबी दिली. आणि विशेष म्हणजे यादवांच्या या नियमावलीचे पालन करण्यासाठी आणि उल्लंघन करणार्‍यावर कारवाई करण्यासाठी एका महिला होमगार्डची व्यापरार्‍यांच्या मार्फतीने नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस कर्मचारी मनोज लातूरकर, बाळासाहेब यादव, नरुटे यांच्यासह पत्रकार व सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.

काही प्रमाणात पुढे आलेली दुकाने मागे घेतली आहेत. या रस्त्यावरची गर्दी पाहता वाहतूक नियंत्रणासाठी सम-विषम पार्किंग करणे किंवा आणखी वेगळे प्रयोग करणे शक्य नव्हते. त्यामुळे नायलॉन दोरीमुळे एका रेषेत वाहने उभी राहतील. रस्ता मोकळा होईल. कुणाला त्रास होणार नाही.एका रेषेत असलेल्या वाहनांमुळे कर्जत शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.
                                                -चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक कर्जत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news