आंदोलन अस्तित्वासाठी पण जनाधार नाही ! : मंत्री राधाकृष्ण विखे

आंदोलन अस्तित्वासाठी पण जनाधार नाही ! : मंत्री राधाकृष्ण विखे
Published on
Updated on

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीवर विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाही. अस्तित्वासाठी त्यांची आंदोलने सुरू असली, तरी जनाधार कुठेही नाही. त्यामुळेच प्रसिध्दी मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पदयात्रेपेक्षा काँग्रेस छोडोचा कार्यक्रम संपूर्ण देशात जोरात सुरू झाल्याची टीका महसूल दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मंजूर झालेल्या साहित्याचे वितरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नगर तालुक्याच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. त्यावेळी मंत्री विखे बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, प्रतिभाताई पाचपुते, खासदार डॉ. सुजय विखे, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, सरपंच विजय शिळमकर, अक्षय कर्डिले, संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डिले, अविनाश घिगे, उपस्थित होते.

वयोश्री योजनेत नगर जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास, हाच मंत्र देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. केंद्र सरकारचे निर्णय धनदांडग्या व्यक्तिंसाठी नाहीत, तर समाजातील शेवटचा माणूस कल्याणकारी योजनांचा लाभार्थी झाला असल्याचे विखे म्हणाले. कोरोनामध्ये आर्थिक महासत्ता असलेले देश आर्थिक संकटात सापडले. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या दूरद़ृष्टीच्या निर्णयांमुळे देशात विक्रमी मोफत लसीकरण झाले. त्यामुळे भारत पुन्हा उभारी घेऊन वाटचाल करीत आहे. देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देऊन प्रधानमंत्र्यांनी उपासमारी होऊ दिली नाही.

राज्यात सतेवर असलेल्या आघाडी सरकारने काय दिले, असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर दिसत होते. माझे कुटुंब तुमची जबाबदारी, असा एकमेव कार्यक्रम सुरू होता. जिल्ह्यात तीन मंत्री होते. परंतु, अडीच वर्षांत एकही विकास काम होऊ शकले नसल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.

आघाडी सरकारने पेट्रोल, डिझेल वरील कर माफ केले नाहीत. पण दारू स्वस्त केली. आज महागाईच्या कारणाने आंदोलन करणारे सत्तेत असताना जनतेला दिलासा देऊ शकले नाहीत. फक्त मोदी सरकारवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. परंतु, मोदी सरकारकडे बोट दाखवायलाही जागा नाही. आपल्या आठ वर्षांच्या यशस्वी कार्यामुळेच मोदी विश्वनेता बनले असल्याचा अभिमान असल्याचे विखे म्हणाले.

राज्यात नव्याने आलेल्या सरकारने सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. कोविड काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतचा संपूर्ण खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
जलजीवन मिशन अंतर्गत बुर्‍हाणनगर प्रशिक्षण आणि पुरवठा योजनेसाठी 195 कोटी रुपयांचा निधी शिंदे व फडणवीस सरकारने मंजूर केला असल्याचे सांगतानाच जिल्हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून साकळाई व कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

खासदार विखे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून 60 वयावरील नागरिकांसाठी मोफत साहित्य वाटप होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी स्वीकारली आहे. एक रुपयाही न घेता घरी जाताना किमान दहा हजार रुपयांचे आवश्यक साहित्य ज्येष्ठ नागरिक घेऊन जाणार आहेत. केंद्राच्या विविध कल्याणकारी योजना मतदारसंघात राबवून जनतेपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली.

माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या दूरद़ृष्टीने केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य वाटत आहे. खासदार विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यासाठी शिबिरे घेतली. धकाधकीच्या जीवनात वृद्धांना देण्यासाठी मुलांकडे वेळ नाही. अशावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून वृद्धांना आवश्यक साहित्य वाटले.

आमदार शिंदे म्हणाले की, 195 कोटीच्या जीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'हर घर जल' योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, ही योजना केंद्र सरकारने सुरू केल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

भारत जोडो, की काँग्रेस छोडो?
काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान सुरू केले आहे. भारत जोडो अभियानाला प्रतिसाद, तर मिळत नाही. त्या उलट काँग्रेस छोडो, अशी परिस्थिती देशात आहे, अशी टीका मंत्री विखे यांनी भारत जोडो अभियानाबद्दल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news