अकोले : आढळा आणि बेलापूर दोन्ही तुडूंब !

अकोले : आढळा आणि बेलापूर दोन्ही तुडूंब !

गणोरे/बोटा : अकोले तालुक्यातील आढळा आणि बेलापूर ही दोन्ही धरणे तुडूंब भरली आहेत. लाभक्षेत्रातील बळीराजासाठी ही गुड न्यूज ठरल्याने समाधान व्यक्त होत आहे. बेलापूर धरण भरल्याने पुढे असलेले कोटमारा धरण देखील येत्या दोन दिवसांत भरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून आढळा पाटलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांत 239 द.ल.घ. फूट विक्रमी पाण्याची आवक होऊन देवठाण (ता. अकोले) येथील आढळा नदीवरील आढळा जलाशय आज शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला.

आढळा परिसराला वरदान ठरणारा व संगमनेर, अकोले, सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रात सिंचनासाठी उपयोगी येणारा आढळा नदीवरील आढळा जलाशय 1 हजार 60 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन पूर्ण क्षमतेने भरला. गुरुवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसाने 139 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली.

धरणात गेल्या वर्षाचे 450 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. यावेळी वर्षभर लाभक्षेत्रात पाणी पातळी चांगली असल्याने पाण्याची मागणी कमी होती. त्यामुळे धरणात 45 टक्के पाणीसाठा अगोदरचा होता. यावर्षी मान्सून वेळेवरच दाखल झाला. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे धरण अवघे आठ ते नऊ दिवसांत भरले आहे. तीन तालुक्यांच्या लाभ क्षेत्रातील 3 हजार 914 हेक्टर सिंचन क्षेत्र या जलाशयातील पाण्यावर अवलंबून असते. धरणातील 975 दशलक्ष घनफूट पाणीसाठा सिंचनासाठी उपयुक्त असून, उर्वरित 85 दशलक्ष घनफूट मृतसाठा आहे.

यंदा 84 दिवस आधी भरले धरण
2005 साली आढळा धरण 30 जूनला भरले होते. यावेळी ते 15 जुलै 2022 रोजी सकाळी 6 वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मागील वर्षी आढळा जलाशय 8 ऑक्टोबर 2021 रोजी भरले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी 84 दिवस आधी आढळा धरण भरले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news