अकोले : पुढारी वृत्तसेवा : अगस्ती साखर कारखाना ही अकोल्याची भाग्यलक्ष्मी आहे. हा कारखाना चालला पाहिजे. मात्र, झालेल्या कर्जासाठी चेअरमन या नात्याने पिचड हेच जबाबदार आहेत. तरीही पिचड हे जाणीवपूर्वक सीताराम गायकर यांना टार्गेट करुन बदनामी करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी केला.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने अकोले येथील विठ्ठल लॉन्स येथे आ. डॉ. किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.
आ. अजित पवार म्हणाले, सत्तेचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करायचा असतो. कारखान्यात 32 वर्षांत बदल होणे अपेक्षित असताना, तो न झाल्याने नेतृत्वच जबाबदार आहे.
संस्था चालविण्यासाठी नव्या दमाचे व अनुभवी लोक पाहिजेत, असे ते म्हणाले. अगस्ती कारखाना टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शेतीसाठी नवीन उद्योग सुरू झाला पाहिजे. अल्कोहोल व इथेनॉल उत्पन्नासाठी उसाच्या रसाचा उपयोग केला जाणार आहे. ऊस उत्पादक ते कारखानदार यांच्यातील दुवा तयार करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. राज्यासह देशाच्या साखर उद्योगाला आश्वासित दिशा देण्याचे काम नेते शरद पवार यांनी केल्याचे आ. पवार म्हणाले.
कारखान्याच्या संचालकांत कोणतेही वाद होऊ देऊ नका. झालेच तर माझ्याशी गाठ आहे, असा सूचक इशारा देत, कारखाना सभासदांच्या फायद्याचे निर्णय घेतले जातील. सभासद कारखान्याचे मालक आहेत. त्यामुळे शेतकरी समृद्धी मंडळ योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. आमदारकीच्या वेळी आमच्या विनंतीला मान देऊन आ. डॉ. किरण लहामटेंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिल्याप्रमाणे कारखान्याच्या निवडणुकीत समृद्धी मंडळाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या. तुमचा विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे आ. अजित पवार यांनी ठाम आश्वासन दिले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर म्हणाले की, शेतकर्यांची कामधेनू वाचविण्यासाठी शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना केली. देशाचे नेते शरद पवार, आ. अजित पवार यांच्यामुळे कारखान्याला अनेक वेळेला मदत झाली. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले तर अगस्ती कारखाना सुरु ठेवण्याबरोबरच चालला पाहिजे म्हणून जिल्हा बँक, पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. तालुक्यात परिवर्तन करायला निघालेली दशरथ सावंत व बी. जे. देशमुख हे कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत.
अठ्ठावीस वर्षांत चेअरमनला आचारसंहिता बाळगता आली असती, तर हा कारखाना सुजलाम्-सुफलाम् झाला असता. पतसंस्था, जिल्हा बँक आमच्याकडे आहेत. त्यामुळे कारखाना चालविण्यास अडचण येणार नाही. असे गायकर यांनी सांगितले.
जि. प. माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे मधुकर नवले, काँम्रेड अजित नवले, कारभारी उगळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे, मीनानाथ पांडे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे, महेश नवले, भाऊपाटील नवले, सुनीताताई भांगरे, स्वाती शेणकर, जिजाबाई नवले आदी यावेळी उपस्थित होते.
..तर कारखान्यास अर्थिक फटका : पवार
खासदार, आमदार निवडणुकीत आर्थिक फटका बसत नाही. परंतु, साखर कारखान्यात चुकीचे संचालक निवडले, तर शेतीसह आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कारखाना चालविताना अनेक प्रॉडक्ट निर्मिती केली, तरच कारखाना कर्जमुक्त होऊ शकेल, असे सांगत अकोले तालुका शिक्षण संस्था मुलांच्या शिक्षणासाठी काढली आहे. तिघांनी संस्था स्वतःची करण्याचे कुठेतरी थांबले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.