झेडपीची पोरं कोडिंगमध्ये ‘मास्टर’; पुण्यात संगणकीय सादरीकरणात जिंकली मने

झेडपीची पोरं कोडिंगमध्ये ‘मास्टर’; पुण्यात संगणकीय सादरीकरणात जिंकली मने
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : यापूर्वी कधी संगणक हाताळले नाही. लॅपटॉपला साधा स्पर्शही केला नाही. तरीही प्रबळ इच्छाशक्ती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि खासगी कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करत नगर झेडपीच्या 36 मुलांनी चक्क कोडिंगचे ज्ञान अवगत करून त्याद्वारे सादर केलेले प्रोजेक्ट कौतुकाचा विषय ठरले. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झालेल्या कार्यशाळेत हे प्रोजेक्ट सादर केले हे विशेष! त्यामुळे भविष्यात झेडपीची पोरंही कोडिंगमध्ये 'मास्टर' झालेली दिसणार आहेत.

एकविसाव्या शतकातील कौशल्ये आत्मसात करावी, मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग, सांघिक कार्य, तार्किक विचार आणि कोडिंग यांचे ज्ञान वाढीस लागावे, या उद्देशाने सन 2022-23 पासून कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन हा उपक्रम जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन फ्यूचर इंजिनीअर, लीडरशिप फॉर इक्विटी, कोड टू एनहान्स लर्निंग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था त्यात योगदान देत आहेत.

चार तालुक्यांतील 13 शाळा
या उपक्रमांतर्गत संगमनेर, नगर, कर्जत व जामखेड या तालुक्यांतील 13 शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीमार्फत संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. यापैकी नगर आणि संगमनेरमध्ये विद्यार्थी संगणक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यक्रमही घेतला जात आहे.

सायन्स हॅकाथॉनमध्ये 36 विद्यार्थ्यांचा सहभाग
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सायन्स हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळांतील 21, तर माध्यमिक शाळांतील 15 अशा एकूण 36 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे जिल्हास्तरावर आयोजन करून त्यात उत्तम कामगिरी करणार्‍या पाच प्राथमिक व दोन माध्यमिक अशा एकूण सात शाळांमधील 36 विद्यार्थ्यांची पुणे येथील कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली.

कोडिंग प्रोग्रॅममधून सोल्युशन
अ‍ॅमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर, पुणे येथे आयोजित कार्यशाळेत आपल्या आसपासच्या समस्या आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कसे सोडवू शकतो, यावर सविस्तर सत्र घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गटांमध्ये समस्या निवडून त्यावर आधारित सोल्युशन तयार केले. हे करताना विद्यार्थ्यांनी कोडिंग करून प्रोग्रॅम तयार केले व ते उपस्थितांसमोर सादर केले.

नगरच्या मुलांचा पुण्यात डंका
शिक्षणामधील लैंगिक विषमता, गरिबीचे मुलांच्या शिक्षणावर होणारे परिणाम, घरात आईला कमी व बाबांना अधिक मानसन्मान मिळतो इत्यादी विषयांचा पुण्यातील कार्यशाळेत समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार करून ते सादर केले. त्यात कोपरगावचे कर्मवीर भाऊराव पाटील तांत्रिकी व माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषदेच्या कर्‍हे व पारेगाव बुद्रुक येथील शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रोजेक्ट उपस्थितांना आश्चर्यचकित करणारे होते. त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

खूप काही शिकायला मिळालं..
पूर्वी कधी संगणक, लॅपटॉप फार माहीत नव्हते. त्यामुळे थोडी धाकधूक होतीच. मात्र इरफान सर आणि त्यांच्या टीमने मला समजेल असे शिकवले. त्यामुळे मला या उपक्रमात कोडींग आणि खूप काही नवीन तंत्रज्ञान अवगत करता आले, असे मनोगत बाबुर्डी घुमटचा सहावीचा विद्यार्थी तन्मय संतोष चव्हाण याने 'पुढारी'कडे व्यक्त केले.

तंत्रज्ञानात नावलौकीक मिळविलेल्या सात शाळा
पारेगाव बुद्रुक (संगमनेर), कर्‍हे (संगमनेर),वडगाव लांडगा (संगमनेर), बाबुर्डी घुमट (नगर),कोकमठाण (कोपरगाव),क.भाऊराव पाटील माध्य.तांत्रिक विद्यालय कोपरगाव, न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथ नगर (पाथर्डी)

संबंधित कंपन्यांशी झालेल्या कराराच्या माध्यमातून व सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या मुलांनी पुणे येथील कार्यशाळेत चांगल्या प्रकारे कोटींगचा वापर करून प्रोजेक्ट सादर केले. झेडपीच्या मुलांचे हे यश नक्कीच इतर मुलांना प्रेरणा देणारे ठरेल.
                                            -भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news