

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : प्रभात दूध डेअरीच्या टँकरने तळेगावातील एका मोटारसायकलला समोरून जोरात धडक दिल्याने तरुण ठार झाला, तर दुसर्या घटनेमध्ये अंगणात खेळत असलेल्या मेंढवण येथील 4 वर्षांच्या चिमुरडीला डंपरने चिरडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तालुका पोलिसांनी सांगितले की, पहिल्या घटनेमध्ये तालुक्यातील तळेगाव शिवारात लोणी-नांदूर शिंगोटे रस्त्यावर हॉटेल कमलेशजवळ सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पिंपळे येथील रवी चकोर यांच्या खडीक्रशरवरून घराकडे येणार्या रवींद्र बाळासाहेब पवार (वय 32 वर्षे) या तरुणाच्या (क्र. एम. एच. 17 बी.जी. 765) या मोटारसायकलला तळेगावहून नांदूर शिंगोटेच्या दिशेने जाणारा प्रभात दूध डेअरीचा टँकर (क्र. एम. एच. 17 बी. डी. 4504) याने जोरात धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात रवींद्र पवार हा तरुण गंभीर जखमी झाला. टँकर चालक जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल न करता वाहन सोडून मारहाणीच्या भीतीने पळून गेला.
दरम्यान, जखमी रवींद्र पवार यास सुरुवातीला तळेगाव येथे एका खासगी दवाखान्यात नेले. नंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत रवींद्र यांचा भाऊ किरण बाबासाहेब पवार याने रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभात दूध डेअरीच्या टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सुजित ठाकरे करीत आहेत.
दरम्यान, दुसर्या दुर्घटनेमध्ये मेंढवण येथे माळवाडी वस्तीवर राहणारे रमजान अहमद पठाण यांच्या अंगणात 4 वर्षांची नात माही अजीज पठाण खेळत होती. त्यांच्या घरासमोर राहणार्यांचा डंपर (क्र. एम. एच. 04/ एफ. डी. 4176) च्या चालकाने डंपर मागे घेतल्याने टायरखाली सापडून माही अक्षरशः चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. मृत माहिचे आजोबा रमजान पठाण यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी चालक राजेंद्र बढेविरुद्ध गुन्हा नोंवदवून अटक केली. तपास पो.उ.नि. विजय खंडीझोड करीत आहे.