नगर तालुका : ना इमारत..ना कार्यालय…तरीही उभे दूरक्षेत्र!

नगर तालुका : ना इमारत..ना कार्यालय…तरीही उभे दूरक्षेत्र!

Published on

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील 'एमआयडीसी' पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या जेऊर पोलिस दुरुक्षेत्राला जागा उपलब्ध नसल्याने पोलिसांची परवड सुरू आहे. पोलिस दुरक्षेत्राला जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. 'एमआयडीसी' पोलिस ठाण्याअंतर्गत जेऊर येथे पोलिस दूरक्षेत्र आहे. दुरक्षेत्र फक्त कागदोपत्री आहे. दुरक्षेत्राला ना स्वतःची जागा…ना इमारत…ना मूलभूत सुविधा…तरीही जेऊर पोलिस दुरक्षेत्र अस्तित्वात आहे.

पोलिस दुरुक्षेत्राच्या जागेसाठी अनेक वर्षांपासून शोध सुरू आहे. सरकारी जागा उपलब्ध आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे दुरक्षेत्राच्या जागेचे भिजत घोंगडे आहे. पूर्वी जेऊर दुरक्षेत्र ग्रामपंचायतच्या जागेच्या खोलीमध्ये सुरू होते. परंतु, तेथे पोलिसांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. आता, ती जागा मोडकळीस आली आहे. त्यातच ग्रामपंचायतने पोलिसांना ही जागा खाली करण्याबाबत पत्र दिले आहे. यानंतर पोलिसांकडून दुरक्षेत्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयास पत्र दिले. यानंतर याबाबीकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही.

जेऊर गावात शासकीय जागा ही उपलब्ध आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तेथेही सुसज्ज पोलिस दुरुक्षेत्र होऊ शकते. परंतु, त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तत्काळ दुरुक्षेत्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत टोल नाक्यावरील छोट्याशा खोलीतून दूरक्षेत्राचे कामकाज सुरू आहे. रस्त्यावर होणारे अपघात, रस्ता लूट, चोर्‍या, डिझेल चोर, वाद आदींसाठी जेऊर पोलिस दूरक्षेत्र महत्त्वाचे आहे. जेऊर गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असताना पोलिस दुरुक्षेत्राला जागा उपलब्ध होत नाही, हे विशेष आहे. अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या पोलिस दुरुक्षेत्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वरिष्ठ पातळीवरून हालचाली होणे गरजेच
जेऊर गावात महामार्गा लगत सरकारी जमीन आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे काम सुरू आहे. तेथेही प्रस्ताव बनवून पोलिस दुरुक्षेत्राला जागा उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होणे गरजेचे आहे.

पोलिस दुरक्षेत्राचा फायदा
जेऊर, धनगरवाडी, पांढरीपूल, खोसपुरी, उदरमल, सोकेवाडी, मजले चिंचोली, पांगरमल, आव्हाडवाडी, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, डोंगरगण, शेंडी, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैणी, मांजरसुंबा गड, पोखर्डी या गावातील नागरिक, महामार्गावरील अपघात, रस्ता लूट यासाठी जेऊर येथील पोलिस दूरक्षेत्र फायद्याचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news