नगर : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 51 टक्के उमेदवारांची दांडी

नगर : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 51 टक्के उमेदवारांची दांडी

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदासाठी रविवारी (दि.2) लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेला एक हजार 606 उमेदवार पात्र ठरले होते. प्रत्यक्षात 781 उमेदवारांनीच परीक्षा दिली. यावेळी तब्बल 51 टक्के उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याचे दिसून आले. पोलिस भरतीच्या शिपाई पदासाठी लेखी परीक्षा बहुतांश जिल्ह्यात एकाचवेळी आणि एकाच दिवशी पार पडली. नगर पोलिस दलात शिपाई पदासाठी 129, तर चालक पोलिस शिपाई पदासाठी 10, अशा 139 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. यातील 129 पोलिस शिपाई जागांसाठी एक हजार 606 उमेदवार पात्र ठरले होते. मात्र, यापैकी तब्बल 825 उमेदवार गैरहजर होते.

यंदा उमेदवारांना विविध पोलिस दलात मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी देता आली. मात्र, लेखी परीक्षा एकाचवेळी होती. त्यामुळे ज्या दलात अधिक जागा उपलब्ध आहे, किंवा मैदानी चाचणीत ज्या जिल्ह्यात अधिक गुण मिळाले आहे, त्या ठिकाणी उमेदवारांनी लेखी परीक्षेला प्राधान्य दिले. जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा सकाळी 8.50 ते 10.20 या वेळेत पार पडली. उमेदवारांना परीक्षा केंद्रावरून बाहेर पडताना त्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली.

पोलिस दलाकडून लवकरच लेखी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून, त्यानंतर काही दिवसातच अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेच्या नियोजनासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे साडेतीनशे पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रक्रियेत सहभागी झाले होते.

186 महिला उमेदवारांची उपस्थिती
पोलिस शिपाई पदाच्या झालेल्या लेखी परीक्षेसाठी 186 महिला उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. महिला उमेदवारांचीही मोठ्या संख्येने गैरहजेरी होती. तसेच, एका तृतीयपंथी उमेदवारानेही परीक्षेला हजेरी लावली.

परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण
अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, मराठी व्याकरण या घटकांसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिस दलाकडून करण्यात आले.

असे ठरणार मेरिट
लेखी परीक्षेनंतर आता अंतिम गुणवत्ता यादी पोलिस दलाकडून जाहीर होणार आहे. मैदाणी चाचणीचे गुण व लेखी परिक्षेचे गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल..

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news