जेऊर आरोग्य केंद्राचे काम कासवगतीने; इमारतीअभावी रुग्णसेवा देताना डॉक्टरांची कसरत

जेऊर आरोग्य केंद्राचे काम कासवगतीने; इमारतीअभावी रुग्णसेवा देताना डॉक्टरांची कसरत

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याने रुग्णांच्या तपासणीकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. इमारत नूतनीकरणाचा कार्यारंभ आदेश 23 ऑगस्ट 2019 रोजी देण्यात आलेला असून कामाची मुदत एक वर्षाची होती.

नूतनीकरणांतर्गत मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाचे काम करण्यात येणार आहे. सदर काम धनस्मृती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीला देण्यात आलेले आहे. कोरोनाच्या नावाखाली सुरुवातीला कामास उशीर झाल्याचे सांगण्यात आले. जुनी इमारत जमीनदोस्त झाल्याने कोरोना काळात देखील लसीकरण, कोरोना तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णांना अक्षरशः भरउन्हात उभे राहावे लागत होते. काम संथ गतीने सुरू असल्याने सद्यःस्थितीत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णांना बसण्यासाठीदेखील जागा नाही.

आरोग्य केंद्राचे कामकाज छोट्याशा पत्र्याच्या शेडमधून सुरू आहे. रुग्णांची तपासणीदेखील करण्यास जागा नाही. गरोदर माता तपासणी, बालकांचे लसीकरण करण्यासाठी मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. परंतु त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या; परंतु उपयोग झाला नाही. सदर कामावर प्रशासनाचे नियंत्रण नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

जेऊर आरोग्य केंद्राचा फायदा जेऊरसह ससेवाडी, डोंगरगण, बहिरवाडी, धनगरवाडी, इमामपूर, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, पांगरमल या गावांना होतो. शिवाय नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना प्राथमिक उपचारांसाठीही होतोे. परंतु काम संथ गतीने सुरू असल्याने सर्वांचीच अडचण निर्माण झालेली आहे.

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले, तसेच डॉ. पूजा आंधळे या आपल्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. बसण्यास जागा नसतानादेखील आलेल्या रुग्णांना आहे त्या परिस्थितीत सेवा देण्याचे कार्य अधिकारी व कर्मचार्‍यांकडून सुरू आहे.

आरोग्य केंद्रांतर्गत डेंगी, मलेरिया, टायफड यांसारख्या विविध आजारांवर मोफत औषधोपचार मिळत आहेत. परंतु जागेअभावी रुग्ण खासगी रुग्णालयाकडे धाव घेतात. त्यामुळे रुग्णांचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, येथे लवकरच साठ वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी नाकावाटे देण्यात येणारा कोविडचा बूस्टर डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या वतीने देण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक

कोरोना काळात तसेच नेहमीच रुग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले व डॉ. पूजा आंधळे आपल्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले होते. येथे मिळणार्‍या सेवेमुळे रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे, अशी माहिती जेऊरचे माजी उपसरपंच बंडू पवार यांनी दिली.

आरोग्य केंद्रातील उपलब्ध मोफत सुविधा

रक्तांच्या सर्व तपासण्या व औषधे
गरोदर माता सर्व तपासण्या व औषधे
रक्तदाब तपासणी व औषधोपचार
रक्तातील साखर तपासणी व औषधोपचार
गरोदर मातेची एक सोनोग्राफी मोफत
लहान बालकांचे लसीकरण
श्वानदंशावरील लस

प्रसूतीसाठी प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध असूनही जागेअभावी येथे प्रसूती करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गरोदर महिलांची हेळसांड होत आहे.

                                – डॉ. पूजा आंधळे, वैद्यकीय अधिकारी

इमारतीचे काम सुरू असल्याने रुग्णांना अ‍ॅडमिट करण्यास जागा नाही. परंतु रुग्णतपासणी, औषधोपचार, तसेच विविध लसीकरणाचे काम सुरू आहे.

                          – डॉ. योगेश कर्डिले, वैद्यकीय अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news