कर्जतला मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी? : नगरसेवक झाले आक्रमक

कर्जतला मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी? : नगरसेवक झाले आक्रमक

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत नगरपंचायतीला दीड वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही. त्यामुळे काल (शुक्रवारी) गटनेते संतोष मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मुख्याधिकार्‍यांसह सर्व रिक्तपदे तत्काळ भरा, अन्यथा 26 जानेवारीपासून कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी गटनेते संतोष मेहत्रे, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, लालासाहेब शेळके, डॉ. राजेंद्र पवार उपस्थित होते.

गटनेते संतोष मेहत्रे म्हणाले, कर्जत नगरपंचायतीमधील मुख्याधिकार्‍यांसह रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी उपोषण केले. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरसेवकांची मागणी राज्य सरकारला कळविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, कर्जत नगरपंचायतीला मुख्याधिकारी मिळाला नाही. याशिवाय नगरपंचायतीत अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, नगर रचना सहायक ही पदे रिक्त आहेत.

त्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राज्यातील सत्ताबदलानंतर विधानपरिषदेचे आमदार राजकारण करून जाणीवपूर्वक नगरपंचायतीला मुख्याधिकारी व इतर अधिकारी मिळू देत नाहीत. लोकप्रतिनिधीने संकुचित वृत्ती न ठेवता फक्त निवडणुकीच्या वेळी राजकारण करावे, असाही सल्ला त्यांनी दिला. येत्या 26 जानेवारीपर्यंत र्‍कित पदे न भरल्यास कर्जत तहसील कार्यालयासमोर नगरपंचायतीचे पदाधिकारी व नगरसेवक उपोषण करतील, असा इशारा मेहत्रे यांनी यावेळी दिला. निवेदनावर नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, भाऊसाहेब तोरडमल, छाया शेलार, सुवर्णा सुपेकर, नामदेव राऊत, सतीश पाटील, लताबाई खरात, ज्योती शेळके, ताराबाई कुलथे, अमृत काळदाते, प्रतिभा भैलुमे यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news