नेवासा : पोलिस अधिकारी का ठरतात वादग्रस्त? 15 वर्षांत बदलले 19 पोलिस निरीक्षक

police
police
Published on
Updated on

नेवासा/कुकाणा :  नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक कारणांमुळे संवेदनशील म्हणून ओळख असणार्‍या नेवासा पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकारीच का वादग्रस्त ठरतात, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. नियमांमध्ये काम करणार्‍यांविरोधात कारस्थान रचले जाते, अशी चर्चा जनतेमध्ये आहे. त्यामुळेच की काय, गेल्या 15 वर्षांमध्ये नेवाशात 19 पोलिस निरीक्षक बदलले आहेत.
नेवासा पोलिस ठाणे अनेक वर्षांपासून तहसीलदार, तसेच पोलिस निरीक्षकांवर झालेला गोळीबार, पोलिस ठाण्याच्या आवारात वकिलाची झालेली हत्या, दोन समाजात झालेल्या दंगली, पोलिस निरीक्षक म्हणून काम केलेल्या पोलिस ठाण्यातच अधिकारी आणि पत्रकाराविरुद्ध दाखल झालेला खंडणीचा गुन्हा, यासह विविध मुद्यांवरून जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात नेवासा पोलिस ठाणे चर्चेत असते.

या पोलिस ठाण्यात अनेक चांगले अधिकारी येऊन गेले. परंतु नेवासा पोलिस ठाण्यात नियमानुसार व कायदेशीर काम करणार्‍या अधिकार्‍यांना वादग्रस्त ठरवण्याचा प्रकार सातत्याने घडत आला आहे. आपणही वादग्रस्त ठरू नये, म्हणून अनेक अधिकार्‍यांना विनंती बदली करुन घेण्यास भाग पाडण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात दबक्या आवाजात आहे. आपल्या इशार्‍यावर न नाचणार्‍या चांगल्या आणि कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांवर एखाद्या संवेदनशील घटनेचा आधार घेत बदलीसाठी दबाव आणला जातो किंवा कारस्थाने रचून बदनामीची मोहोर लावण्याचा प्रयत्न होतो. प्रसंगी अधिकार्‍यांवर निलंबनासारख्या कारवायाही झाल्या आहेत.

गेल्या 15 वर्षांत अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत. या 15 वर्षांत नेवासा पोलिस ठाण्याचे 19 पोलिस निरीक्षक पाहिले. पोलिस निरीक्षक सुभाष गायकवाड यांनी 1 वर्ष आणि 4 दिवस पदभार सांभाळला. पंडित केंद्रे यांनी 7 महिने 4 दिवस, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी 18 दिवस, अशोक आम्ले यांनी 9 महिने 10 दिवस, उत्तमराव चौधरी यांनी 16 महिने 26 दिवस, कैलास गावडे यांनी 16 महिने 27 दिवस, मुकुंद आघाव यांनी 23 महिने 1 दिवस, डी. बी. पारेकर यांनी 2 महिने 22 दिवस, कैलास फुंडकर यांनी 2 महिने 28 दिवस, सुरेश शिंदे यांनी 22 महिने 8 दिवस, अनिल लंबाते यांनी 5 महिने 21 दिवस, संपत शिंदे यांनी 13 महिने 2 दिवस, प्रवीण लोखंडे यांनी 10 महिने 27 दिवस, सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी 4 महिने 24 दिवस, रणजीत डेरे यांनी 2 वर्ष 1 दिवस, आयपीएस अभिनव त्यागी यांनी 2 महिने 23 दिवस, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर यांनी 25 दिवस, तर सध्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी यापूर्वी 5 महिने 27 दिवस, बाजीराव पवार यांनी 9 महिने 16 दिवस पदभार सांभाळला. पोलिस अधिकार्‍यांच्या बदलीसाठी 3 वर्षांची मर्यादा असताना केवळ मुकुंद आघाव व रणजीत डेरे या दोघांनीच दोन वर्षे ओलांडली. परंतु दोन्ही अधिकार्‍यांवर शेवटच्या टप्प्यात पोलिस अधीक्षकाकडून कारवाई झाली. केवळ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे सर्वाधिक काळ पदभार स्वीकारून सहिसलामत बदलून गेले. काही निरीक्षकांनी स्वतःहून विनंती बदल्या करून घेतल्या. काही पोलिस निरीक्षकांना बदनामी आणि निलंबनास सामोरे जावे लागले. तब्बल 12 अधिकार्‍यांविरोधात कारवाया झाल्या.

नेवासा तालुक्याचा इतिहास बघता अवैध धंदा करणार्‍यांंना स्वतःच्या स्वार्थासाठी चांगले अधिकारी नको आहेत. या माफियांवर कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांना विविध हातखंडे वापरुन बदनाम केले जाते. तालुक्यात वाळू माफिया, लॅण्ड माफिया, गोमांस तस्कर आणि त्यांच्याकडून हप्तेखोरी करणारे दलाल आहेत. अशांवर कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांना संवेदनशील घटनांत 'टार्गेट' केले जाते. मागच्या अधिकार्‍यांच्या बदल्या आम्हीच केल्या, असे सांगून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्नही या टोळ्यांकडून होतो.
अ‍ॅड. अण्णासाहेब आंबाडे, अध्यक्ष, नेवासा जिल्हा प्रॅक्टिशनल बार

नेवासा ही संत ज्ञानेश्वर, संत किसनगिरी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. जगाला शांततेचा संदेश देणार्‍या संत ज्ञानेश्वरांच्याच नगरीत अधिकारी सेवेस येण्यात नकार देतात, हे दुर्दैव आहे. वाळू माफिया, गोमांस तस्कर व दलालांकडून स्वार्थासाठी षडयंत्रे रचली जातात. नेवाशात चांगले अधिकारीही वाईट ठरतात, हे भविष्यासाठी योग्य नाही. यातून जनता आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी बोध घेण्याची गरज आहे.
                                                                  -बापूसाहेब नजन, उद्योजक, भेंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news