कोपरगाव : ‘निकृष्ट’ ठेकेदार कोणीही असो, कारवाई करा : विवेक कोल्हे

कोपरगाव : ‘निकृष्ट’ ठेकेदार कोणीही असो, कारवाई करा : विवेक कोल्हे
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाव्या, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे, अशी आमची भूमिका आहे, असे सांगत नगर परिषदेमार्फत शहरातील रस्ते, गटारी, जलवाहिनी, पेव्हर ब्लॉक अशी काही कामे झाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ठेकेदार कोणीही असो, कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, निकृष्ट काम केल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मांडली. कोपरगाव नगर परिषदेवरील लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत.

नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शहरवासियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगर परिषद प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे हेतूत: दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. नगर परिषद प्रशासनाच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विवेक कोल्हे म्हणाले, नगर परिषदेमार्फत शहरात झालेली बरीच कामे निकृष्ट दर्जाची झाली. या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला. त्यामुळे शासनाचा पर्यायाने नागरिकांनी विविध करांच्या माध्यमातून नगर परिषदेकडे जमा केलेला पैसा मातीत गेला, असा संताप कोल्हे यांनी व्यक्त केला.

शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने नागरिकांना तसेच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक अशा सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित आहे; परंतु कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून असे होताना दिसत नाही. न. पा. प्रशासन व त्यांचे प्रमुख कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून, त्यांच्या इशार्‍यावर काम करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. नगर परिषदेने शहरात तीन-चार वर्षांत रस्ते, भूमिगत गटारी, जलवाहिनी, पेव्हर ब्लॉक आदी कामे केली. यात बर्‍याच कामांचा सुमार दर्जा आहे. नागरिकांनी निकृष्ट कामांविषयी तक्रार केल्यानंतर भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी यासर्व कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणी करून कामे दर्जेदार पद्धतीने व्हावी, यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला, मात्र त्याकडे नगर परिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे आता नागरिकांकडून येणार्‍या वाढत्या तक्रारीवरून दिसत असल्याकडे कोल्हे यांनी लक्ष वेधले.

कोणी तडजोड करून निकृष्ट दर्जाची कामे करीत असेल तर ते अयोग्य आहे. यातून जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे. सार्वजनिक हितासाठी न.पा. प्रशासनाने सर्व कामे दर्जेदार व्हावी, याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.  नगर परिषद प्रशासनाचे चुकीचे नियोजन, अपुरे मनुष्यबळ, तज्ज्ञ, प्रशिक्षित व अनुभवी अधिकार्‍यांची कमतरता, विविध कामांमधील गैरप्रकार, ठेकेदारांकडून होणारी तकलादू कामे व खाबूगिरीच्या वृत्तीमुळे निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांना पाठीशी घालणारे प्रशासन आणि याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.  नगर परिषदेत पुरेसे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रशासन खासगी एजन्सीला कंत्राट देऊन अनेक कामे करवून घेत आहे. यावरून न. पा. चे खासगीकरण झाल्याचे दिसत आहे. विविध कामाचे कंत्राट देताना मोठा भ्रष्टाचार होत आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेच आता प्रशासक असले तरी त्यांचा वचक नसल्याचे दिसत आहे.

त्यातून नगर परिषदेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, गटारी आदी समस्यांबाबत न. प. प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार अर्ज, निवेदने देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. नगर परिषद हद्दीत नव्याने समावेश झालेल्या कोपरगाव ग्रामीणमधील प्रामुख्याने खडकी व लगत परिसरातील नागरिक आजही पाणी, रस्ते, भूमिगत गटारी आदी सुविधांपासून वंचित आहेत. मागील दीड-दोन वर्षांपासून नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत नगर परिषद प्रशासनास वारंवार निवेदने देऊनही अद्यापपर्यंत कसलीही कार्यवाही झालेली नाही ही शोकांतिका आहे. नागरी सुविधांसाठी नागरिक वारंवार मागणी करीत आहेत; पण प्रशासन जर नागरिकांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत नसेल नागरिकांनी दाद कुठे मागायची, असा सवाल विवेक कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

समस्या मांडूनही प्रशासनाच्या दुर्लक्षाने संतप्त

नागरिकांना पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छता आदी मुलभूत सुविधा पुरविण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले आहे. कोपरगावकरांना दररोज शुद्ध व पुरेसे पाणी हवे आहे; पण गेल्या अनेक दिवसांपासून शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नगर परिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरातील पाणी वितरण पूर्णत: कोलमडली आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर नगर परिषद दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. दरमहा कंत्राटदाराला दोन-तीन लाख रुपये देऊनही गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत आहे. गढूळ व दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाच्या जलशुद्धीकरण. पाणी गळती रोखणे, कचरा संकलन, रस्ते, भूमिगत गटारी व अन्य अनेक कामातही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असून, वारंवार तक्रारी व समस्या मांडूनही प्रशासन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विवेक कोल्हे संतप्त झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news