अधिकार्‍यांचा अधिवेशनात पर्दाफाश करू : आमदार प्राजक्त तनपुरे

अधिकार्‍यांचा अधिवेशनात पर्दाफाश करू : आमदार प्राजक्त तनपुरे
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गलथान कारभार, कंत्राटी कर्मचार्‍यांवर झालेला अन्याय तसेच अनेक वर्षांपासून ठेकेदारांची बिले अडकवून ठेवल्याबाबत दै.'पुढारी' ने प्रसारित केलेल्या बातम्यांची दखल घेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यापीठ सभागृहात अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. कृषी व शिक्षण क्षेत्रात राज्याला दिशा देणार्‍या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पावित्र्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांचा हिवाळी अधिवेशनात पडदाफाश करू, असा इशारा आ. तनपुरे यांनी दिला. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी अभियंत्यांसह काही अधिकार्‍यांनी मनमर्जी दाखवीत स्वकीयांना लाभ देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप होता.

तसेच काही कंत्राटी कर्मचारी गलथान कारभाराची माहिती बाहेर देतात, या कारणाने दिवाळी सणापूर्वी 12 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते. तसेच विद्यापीठाच्या बांधकाम विभागामध्ये एका मोठ्या ठेकेदाराच्या दावणीला संपूर्ण विद्यापीठ यंत्रणा बांधत शेकडो ठेकेदारांवर जाणून बुजून अन्याय होत असल्याची चर्चा होत होती. या सर्व प्रश्नांवर दै. 'पुढारी' ने मालिका प्रकाशित केली करीत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली होती.

अखेरीस राज्याचे माजी राज्यमंत्री आ. तनपुरे यांनी विद्यापीठातील अन्यायाबाबत पुढाकार घेतला. बुधवारी सकाळी 9 वाजताच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोखे, अंतरविद्या जलव्यवस्थापण प्रमुख डॉ. महानंद माने, बियाणे विभाग प्रमुख साळुंके आदींच्या उपस्थितीत आमदार तनपुरे यांनी ठेकेदार व कर्मचार्‍यांच्या भावना जाणून घेतल्या.

याप्रसंगी ठेकेदारांनी अनेक धक्कादायक बाब उघडकीस करताना कंत्राटी महिला अभियंता घाडगे यांनी स्वकुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचे कामे दिल्याचे सांगितले. कंत्राटी अभियंता मुसमाडे याची पैसे मागणी करताना कॉल रेकॉर्डींग व्हायरल होऊनही कारवाई झाली नाही. तर दुसरीकडे केवळ शंकेच्या बळावर 12 कर्मचार्‍यांना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घरी जाण्याचा आदेश दिल्याबाबत संताप व्यक्त केला. आ. तनपुरे यांनी संताप व्यक्त करीत महिला अभियंता घाडगे व कंत्राटी अभियंता मुसमाडे यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 12 कंत्राटी कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घ्या, अन्यथा प्रवेशद्वारासमोर ठिया मांडणार असल्याचा इशारा दिला. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने संबंधित 12 कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेत असल्याचे जाहिर केले.

याप्रसंगी विद्यापीठामध्ये एका फरशी बसविणार्‍या रमाकांत यादव नामक बांधकाम कर्मचार्‍याकडे कोणताही जीएसटी परवाना नसताना लाखो रुपयांची बिले लाटल्याचे दाखविण्यात आले. शहरातील एका मोठ्या ठेकेदाराच्या इशार्‍यावर कोट्यवधी रुपयांची कामे शासकीय नियम धाब्यावर ठेवत केल्याचा आरोप बैठकीत झाला. आ. तनपुरे यांनी कुलगुरू डॉ. पाटील यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची मागणी केली. त्यावर आ. तनपुरे यांनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनात विद्यापीठातील सर्व कागदोपत्री पुरावे मला मिळालेले आहे. गैरव्यवहार व हुकूमशाही करणार्‍या अधिकार्‍यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगताच उपस्थितांना टाळ्याचा कडकडाट केला.

'त्या' कर्मचार्‍यांच्या डोळ्यात अश्रू तरळले
आ. तनपुरे व दै. 'पुढारी' ने कंत्राटी कर्मचार्‍यांची वाचा फोडल्याने त्या 12 कर्मचार्‍यांना नियुक्तीचे आदेश मिळताच कर्मचार्‍यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तसेच काही ठेकेदारांना लाखो रुपयांचे कामे करूनही तीन ते चार वर्षांपासून बिले मिळत नसल्याने त्या ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती दयनिय झाली होती. संबंधित ठेकेदारांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा इशारा आ. तनपुरे यांनी बैठकीत दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news