File photo
File photo

पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा झाला ठप्प, 15 गावं तहानलेली

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

बारागाव नांदूर व इतर 15 गावांसाठी संजीवनी ठरलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याने संबंधित गावांमध्ये निर्जळी निर्माण झाली आहे. धरणाच्या पायथ्याशी संबंधित पाणी योजनेची पाईपलाईन फुटल्याने पाणी योजना बंद ठेवली असल्याची माहिती योजना समन्वयक यांनी दिली आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रूक, वळण, पिंप्री चंडकापूर, मांजरी, तांदूळवाडी या 15 गावांमध्ये निर्जळी निर्माण झालेली आहे. बारागाव नांदूर गावामध्ये मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घोडे वस्ती येथे योजनेची पाईपलाईन फुटल्याने वाहते झालेल्या पाण्याने अडचणी निर्माण झालेली आहे.

संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा आहे. त्यामुळे पाईल लाईनच्या दुरुस्तीला विलंब लागत असल्याची माहिती समन्वयक शौकत इनामदार यांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांसह योजनेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे लाभार्थी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन योजनेचे सचिव गागरे, समन्वयक इनामदार यांनी केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news