

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवसपर्यंत 11 सरपंचपदांसाठी 64, तर 109 सदस्यपदांसाठी 414 अर्ज आले आहेत. इच्छुकांनी शुक्रवारी (दि.2) अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. तालुक्यातील भालगाव, तिसगाव, कोरडगाव या गावातील निवडणुकीत सर्वाधिक चुरस दिसणार आहे.
तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याने पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. ग्रामपंचायतीसाठी 2 डिसेंबरपर्यंत अर्ज भरणे, 5 डिसेंबर रोजी छानणी, 7 डिसेंबरला अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून, त्याच दिवशी दुपारी तीननंतर चिन्हांचे वाटप होईल. यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार असून, 18 डिसेंबर रोजी मतदान आणि 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मोहरी सरपंचपदांसाठी तीन, सदस्यसाठी 32, वडगाव सरपंचपदांसाठी चार, सदस्यसाठी 36, सोनोशी 11 व 25, कोळसांगवी तीन व 17, निवडुंगे सात व 41, भालगाव आठ व 79, वैजुबाभुळगाव पाच व 14, कोरडगाव चार व 36, कोल्हार पाच व 31, तिसगाव सहा व 71, जिरेवाडी आठ व 32, असे सरपंचपदांच्या 11 जागांसाठी एकूण 64 उमेदवारी, तर सदस्यपदासाठी 109 जागेसाठी 414 अर्ज दाखल झाले. तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार, मुरलीधर बागुल, भानुदास गुंजाळ यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रात्री उशिरापर्यंत कामकाज करत होते. ऑफलाईन अर्ज स्वीकारल्याने ते अर्ज आता ऑनलाईन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली.