नगर : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या रविवार दि. 16 रोजी 30 केंद्रांवर 10 हजार 456 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच सोमवार दि. 17 रोजी मतमोजणी होणार असून, यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सहकार विभागाचे उपनिबंधक गणेश पुरी यांनी पुढारीशी बोलताना दिली. पुरी म्हणाले, शिक्षक बँकेचे 10456 सभासद आहेत. रविवारी 21 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहेत. 30 केंद्रांवर मतदान बूथ तयार केलेले आहेत. यासाठी 450 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रविवारी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. प्रत्येक बुथवर दोन पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच स्ट्राँगरुमला एक पोलिस उपनिरीक्षक आणि पाच कर्मचार्यांचे पथक तैनात असेल. दुसर्या दिवशी अर्थात सोमवार दि. 17 रोजी अमरज्योत मंगलकार्यालय, नेप्ती या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी 250 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान, सर्वच शिक्षक मंडळांनी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पुरी यांनी केले आहे.