

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्रस्त झालेल्या जोशी वस्ती येथील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.20) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या उपअभियंत्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे जोशीवस्ती येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. वेळोवेळी भेटून, निवेदन देऊनसुद्धा बेजाबदारपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.
तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्र निर्माण दलाचे प्रमुख भालचंद्र सावंत यांनी केले. भालचंद्र सावंत म्हणाले, आपल्या हक्कासाठी आपण याठिकाणी आलो आहोत. प्रशासनाचे आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांना डावलून आपल्या कर्तव्यात कसूर चालविलेला दिसून येत आहे. यावेळी उपअभियंता चौगुले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.
यावेळी दादासाहेब शिंदे, काळू साळुंके, भिवाजी वीरकर, आप्पा सोनवणे, संतोष शिंदे, सचिन साबळे, रमण सोनवणे, सुनीता सानप, नंदाबाई गुलिक, मनिषा जासूद, संगीता भोसले, शिवदास कांबळे, सागर शिंदे, कलाबई कोळी, मारुती फुळमाळी, सिनाप्पा काकडे, दगडू लाला शेख, देविदास कांबळे आदींसह राष्ट्र निर्माण दलाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.