

कुकाणा: पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील माका ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी झालेल्या पंचरंगी लढतीत मकावती माता ग्रामविकास मंडळाच्या विजया पटेकर यांनी दणणीत विजय मिळविला. विजया पटेकर यांना 1325 मते मिळाली. त्यांनी उषा पटेकर यांचा पराभव केला. अटीतटीची लढतीत माजी सरपंच तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक नाथा घुले यांचे पुतणे अनिल घुले यांच्या नेतृत्वाखालील मंकावती माता परिवर्तन पॅनलच्या विजया बाबासाहेब पटेकर यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. घुले गटाचे 10 उमेदवार निवडून आले तर मुळा कारखान्याचे संचालक आबासाहेब पांढरे तसेच खंडू लोंढे यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार उषा पटेकर यांना 1094 मते मिळाली. पांढरे, लोंढे गटाला तीन जागेवर समाधान मानावे लागले. रमेश कराळे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार किशोर शिरसाठ यांना 359 मते मिळाली. या गटाच्या उमेदवाराला विजयाचे खातेही उघडता आले नाही. सरपंच पदाचे अपक्ष उमेदवारांमधील पप्पू पटेकर यांना 109 तर रावसाहेब शिरसाठ यांना 116 मते मिळाली.
वडाळा ग्रामपंचायतीत सत्तांतर, माळीचिंचोरा धनापुणे गटाकडे
नेवासा तालुक्यातील वडाळा ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन, वीस वर्षाच्या सत्तांतराची परंपरा कायम राहीली. सरपंचपदी ललित मोटे यांनी बाजी मारली. तर, माळीचिंचोरा ग्रामपंचायतीत धनापुणे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार राजेंद्र अहिरे विजयी झाले. वडाळा येथे गेल्या वीस वर्षांपासून सत्तांतराची परंपरा आहे. ती यावेळी कायम राहिली. ललित मोटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मोटे 1939 मते मिळवून विजयी झाले. याच पॅनलचे सदस्य पदाचे 9 उमेदवार निवडून आले. सत्ताधारी चांगदेव मोटे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारी ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मीनल मोटे यांना 1419 मते मिळाली. या गटाचा दारुण पराभव झाला असून, या पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.
माळीचिंचोरा ग्रामपंचायतीत तिरंगी लढत असल्याने निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. यात एकनाथ धानापुणे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तुकाराम शेंडे यांनी मागील पंचवार्षिकची निवडणूक एकत्रित लढविली होती. परंतु, या निवडणुकीत ते आमने-सामने उभे ठाकल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत विद्यमान सरपंच एकनाथ धानापुणे यांच्या नेतृत्वाखालील गहिनीनाथ ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार राजू देवराव अहिरे यांना 1104 मते मिळवून विजयी झाले. तसेच, या गटाचे आठ सदस्य पदाचे उमेदवार निवडून आले. तुकाराम शेंडे यांच्या नेतृत्वाखालील गैबीपीरबाबा ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार दादासाहेब अहिरे यांना 1095 मते मिळाली. या गटाचे चार उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत शेंडे यांची 40 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. तर, बापूसाहेब चिंधे यांच्या नेतृत्वाखालील गहिनीनाथ स्वाभिमानी बहुजन ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार गणेश दादासाहेब अहिरे यांना अवघी 853 मते मिळाली. या गटाचा केवळ एक सदस्य निवडून आला.