वाळकीत रंगला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी

वाळकीत रंगला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
Published on
Updated on

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : तीस हजार भाविकांची मांदियाळी, तुंगभद्रा नदीचे पवित्र गंगाजल, देवदेवतांची रथातून ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक अन् मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी, असा 'न भुतो न भविष्यती' नेत्रदिपक महासोहळा नगर तालुक्यातील वाळकी येथे रंगला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र मंत्रालयम् (आंध्रप्रदेश) येथील जगदगुरु श्री मन्मध्याचार्य मुल महा संस्थानचे पीठाधीश श्री सुबुधेद्रतीर्थ स्वामी व सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज यांची कन्या राजश्रीताई यांच्या हस्ते वाळकीचे दैवत सद्गुरु महेंद्रनाथ महाराज यांच्या मूर्तीसह अन्य देवतांच्या मूर्तींची सोमवारी प्राणपतिष्ठा करण्यात आली.

या महासोहळ्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, भाजपाचे जिल्हा संघटक सरचिटणीस दिलीप भालसिंग, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, डॉ. प्रतिभा पाचपुते, बाळासाहेब हराळ, रंगनाथ निमसे आदी उपस्थित होते. मूर्ती प्राणपतिष्ठा सोहळा व महाअभिषेकासाठी तुंगभद्रा नदीतून चारशे नाथभक्तांनी आणलेल्या पवित्र गंगाजलासह सद्गुरु महेंद्रनाथ महाराज, राघवेंद्रनाथ महाराज यांच्या मूर्तींची आणि सुबुधेंद्रतीर्थ स्वामी यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीवर व श्रीराम मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी व दैवी सोहळ्याचे साथीदार होण्यासाठी आलेल्या सुमारे तीस हजार भाविकांच्या मांदियाळीने वाळकी परिसर फुलून गेला. स्वामी सुबुधेंद्रतीर्थ यांनी हिंदीतून आपल्या रसाळ वाणीतून उपस्थिती हजारो भाविकांना उपदेश केला. यानंतर स्वामी सुबुधेंद्रतीर्थ यांची पैशांनी तुला करण्यात आली.
यानंतर दैवतांच्या मूर्तींची प्राणपतिष्ठा करण्यात आल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नेत्रदिपक होण्यासाठी गेल्या महिनाभरापासून नाथसेवकांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले.

वाळकीच्या इतिहासातील सुवर्णक्षण
वाळकी हे बाजारपेठेचे गाव असले तरी धार्मिकतेच्या बाबतीतही ते आघाडीवर आहे. वर्षभर येथे मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. मात्र, आज पार पडलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुवर्णाक्षरात नोंद होईल, असा नेत्रदिपक सोहळा पार पडला. वाळकीकरांचे दैवत सदगुरू महेंद्रनाथ महाराज यांच्यासह अन्य दैवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी व साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील हजारो नाथभक्तांच्या मांदियाळीने वाळकी परिसर भक्तीमय झाला होता.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अन् नाथभक्तांचा जल्लोष
देव दैवतांच्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत येथील मुख्य चौक पंचमुखी मंदिरासमोर आल्यानंतर मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंदीरावरही पुष्पवृष्टी करण्यात आली. आकाशातून होणारी पुष्पवृष्टी पाहून नाथ भक्तांचा व उपस्थित जनसमुदयातून अतिउत्साहाने झालेला जल्लोष गगनाला भिडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news